पाटणा – लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि खासदार चिराग पासवान यांना काका पशुपती पारस यांनी पक्षातून बेदखल केले असून पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पासवान यांच्याशी फारकत घेतल्याने, पासवान यांच्या घरात आणि पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र, आता चिराग पासवान यांना विरोधी पक्षांकडून तगड्या ऑफर येत आहेत. कॉंग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी चिराग पासवान यांना आपल्या सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएची साथ सोडून आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी ऑफर राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून चिराग यांना देण्यात आली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांना तेजस्वी यादवांसोबत येण्याचे आवाहन केले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती ही दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करून, चिराग यांनी दिल्लीत काम करावे असे त्यांना सुचवण्यात आले आहे.
तर कॉंग्रेसनेही चिराग पासवान यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमचंद मिश्रा यांनी, चिराग पासवान यांनी कॉंग्रेसमध्ये सहभागी होऊन विरोधी पक्षाला आणखी मजबूत करावे असे म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी चिराग यांनी जाहीरपणे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. बिहारमध्ये त्यांच्या या विरोधामुळेच नितीश यांच्या पक्षाची ताकद निम्म्याने घटली असून भाजपची ताकद वाढली आहे. तेव्हा गप्प बसणाऱ्या नितीश यांनी आता वेळ मिळताच चिराग यांचा काटा काढल्याचे मानले जाते आहे.