पौड – पुणे-कोलाड महामार्गावर, सुतारवाडी, घोटावडे फाटा, भुकूम येथे साईड गटारीची लेव्हल जास्त केल्यामुळे पाणी रस्त्यावर साचून राहिले. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुणे – कोलाड हायवे हा रहदारीचा असल्याने पाऊस पडल्यानंतर काही मिनिटातच १० ते १५ दुचाकी स्वर त्या ठिकाणी घसरून खाली पडले. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. परंतु त्यांना मुक्कामार मोठ्या प्रमाणात लागलेला आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि अभियंते यांनी या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष न दिल्यामुळे या रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप या ठिकाणी गाडीवरून पडलेले चालक करत होते. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी मुळशीतील नागरिकांनी आंदोलने केली. अनेक बैठका झाल्या परंतु जे व्हायचे तेच झाले. अशा संतप्त भावना यावेळी नागरिक व्यक्त करत होते.
कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना चांगल्या दर्जाचा महामार्ग उपलब्ध न झाल्यामुळे नागरिक निराशा व्यक्त करत होते. महामार्गाला दोन्ही बाजूने पौड, सुतारवाडी, घोटावडे फाटा, पिरंगुट लवळे फाटा, भुकुम, भुगाव या ठिकाणी गटारी बांधण्यात येत आहेत परंतु रस्त्याची उंची आणि गटारीची उंची यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साठवून राहत आहे आणि गटारी मधून वाहून जात नाही त्यामुळे महामार्गावर पहिलाच पावसात पाण्याचे तळे साठलेले आहे.
जोरदार झालेल्या पावसामुळे लवळे फाटा, घोटावडे फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मुळशी तालुका हा प्रचंड पावसाचा तालुका असल्यामुळे या गटाराचे काम होत असताना एम. एस. आर. डी. सी. च्या अभियंत्यांनी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे होते परंतु होतंय तर होऊ दे मला काय करायचंय या भूमिकेतून त्यांनी त्यांच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे मुळशीकरांना या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
घोटावडे फाटा, पिरंगुट या ठिकाणी नागरिकांना बस थांबा नसल्याने नागरिक रस्त्याचा कडेला उभे राहतात त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडी ही रोजचीच असून देखील या ठिकाणी बराच वेळा पोलीस कर्मचारी उपस्थित दिसत नाही.