दुबई – महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्याकडे अफाट क्षमता आहे, असे भाकित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले होते. तेच खरे ठरवत ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्जकडून अफलातून फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. त्याच्या खेळीला सचिननेही दाद देत हा मुलगा मोठ्या स्तरावरही यशस्वी होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत ऋतुराजने दोन अर्धशतके फटकावली आहेत. चेन्नईची कामगिरी या स्पर्धेत फारशी चांगली झाली नसली तरी ऋतुराजच्या तंत्राचे व त्याच्या संयमी तसेच आक्रमक फलंदाजीचे सचिन पाठोपाठ चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही कौतुक केले आहे.
ऋतुराज एक मोठी क्षमता असलेला खेळाडू आहे, असे धोनीने म्हटले होते. त्याला समर्थन देताना सचिननेही ऋतुराजचे कौतुक केले आहे. हा मुलगा मोठा खेळाडू बनण्याची क्षमता असलेला आहे. मी त्याचा खेळ सातत्याने पाहिलेला नाही. पण त्याच्या आयपीएलमधील खेळी पाहिल्यावर असे वाटते की तो येत्या काळात मोठ्या स्तरावरील क्रिकेट निश्चितच खेळेल.