चेहरा बदलण्याची ‘रिस्क’ राष्ट्रवादी घेणार?

दौंड तालुक्‍यात वेगवेगळे मतप्रवाह : टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवारच हवा

केडगाव – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दौंड तालुक्‍यात चेहरा बदलणार, अशा चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत; परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची राज्यातील नाजूक अवस्था पाहता चेहरा बदलण्याची रिस्क राष्ट्रवादी घेईल का? याबाबत शंका निर्माण होत आहे.

दौंड तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे मागील काही वर्षांपासून माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात आहेत. 2009 साली पक्षाने उमेदवारी नाकारली आणि थोरात यांनी बंड करुन अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी दिली होती; परंतु अपक्ष लढून रमेश थोरात मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले. थोरात यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्‍यात आहे. विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यानंतर झालेल्या 2014 सालीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने थोरात यांनाच उमेदवारी दिली. त्यावेळी राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेत आणि धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा लाभ घेत विजय मिळवला; परंतु या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देखील थोरात यांचे मताधिक्‍य 2009 सालच्या निवडणुकी एवढेच म्हणजे 78 ते 79 हजार होते. या निवडणुकीत कुल यांचे पूर्वीपेक्षा मताधिक्‍य वाढल्याने त्यांचा विजय झाला.

आगामी विधानसभा येत्या ऑक्‍टोबर महिन्यात होत आहेत आणि राष्ट्रवादी दौंड तालुक्‍यात चेहरा बदलणार, अशा वावडया उठत आहेत. पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आदी नावे यासाठी चर्चिली जात आहेत; परंतु ज्या -ज्या वेळी तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तालुका पातळीवरील निवडणुका झाल्या, त्यांना कुठेही पक्षीय स्वरूप नव्हते; तर कुल आणि थोरात असेच स्वरूप होते. पक्ष कोणताही असो विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांना पक्षापेक्षा जास्त मानणारे कार्यकर्ते गावागावांत असल्याचे अनेक निवडणुकीत दिसून आले आहे. पक्ष नगण्य आणि कुल-थोरात यांचीच ताकद जास्त असे चित्र बहुतांश वेळा दिसून आले आहे.

आजमितिला जिल्हा बॅंक, तालुका खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आदी सत्तास्थाने थोरात गटाकडे तर तालुका दूध संघ, आमदारकी, भीमा सहकारी साखर कारखाना कुल गटाकडे आहे. या संस्थांवर पक्षापेक्षा थोरात- कुल यांचाच जास्त प्रभाव आहे.

थोरातांमध्ये पिछाडी भरून काढण्याची ताकद
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सात हजार मतांनी तालुक्‍यात पिछाडीवर आहे. ही पिछाडी भरून काढण्यासाठी थोरात हेच योग्य उमेदवार असतील, अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे चेहरा बदलण्याच्या कितीही वावड्या उठत असल्या तरी पक्षाची राज्यातील लोकसभेतील नाजूक स्थिती पाहता उमेदवारी बदलून राष्ट्रवादी रिस्क घेईल, असे सध्या तरी वाटत नाही.

तालुक्‍यात कुल-थोरात यांचेच वर्चस्व
ग्रामपंचायतीपासून सहकारी संस्थापर्यंत कुल-थोरात यांचेच प्राबल्य अधिक, तर पक्ष गौण हे सत्य नाकारता येणार नाही. हे दोन नेते कोणत्याही पक्षात असोत कार्यकर्ते त्यांच्यामागे गेले असल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे आजमितीला रमेश थोरात यांच्याइतका प्रबळ चेहरा राष्ट्रवादीकडे नाही हे पक्षश्रेष्ठी चांगलेच जाणतात; परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चेहरा बदलण्याची रिस्क घेतल्यास विरोधी उमेदवार विद्यमान आमदार राहुल कुल यांना निवडणूक सोपी जाणार यात तीळमात्र शंका नाही. कुल-थोरात यांच्यातील 2019ची लढाई तुल्यबळ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)