कुदळवाडी चौक ः वाहनचालक त्रस्त, बेशिस्त वाहतूक
पिंपरी (प्रतिनिधी) – स्पाइन रस्त्यावरील कुदळवाडी चौकात सुशोभीकरण करण्यात आले आहे. हा चौक वर्तुळाकर आहे. त्यामुळे भोसरी, कुदळवाडी, साने चौक, पिंपरी आदी ठिकाणावरून येणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या चौकात संरक्षक कठड्याला लावण्यात आलेली जाळी तुटल्याने ती रस्त्यात आली आहे. त्यामुळे पिंपरीकडून कुदळवाडी आणि नाशिक रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाला अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांकडून जाळीच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
स्पाइन रोडला या चौकात उड्डाणपूल आहे. त्यामुळे साने चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी उड्डाणपुुलाच्या खालून रस्ता आहे. तेथे वर्तुळाकार गोल भाग उगडा आहे. त्या भागात वाहनाला अपघात होऊ नये म्हणून रस्तेविकास विभागाकडून संरक्षक कठडा उभारून त्याला जाळी ठोकली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांना अपघातपासून बचाव होण्यास मदत होत आहे. परंतु पिंपरी आणि कुदळवाडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या चौकातून जावे लागते. त्यामुळे भोसरीकडून कुदळवाडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पिंपरीकडे येणाऱ्या रस्त्याने पुढे येऊन पीएपपी बस स्थानकाला वळसा घालून जावे लागते. येथे एमआयडीसी, अटो कंपन्या आहेत. त्यामुळे येथे मोठमोठ्या गाड्या येतात त्यामुळे त्यांना ओळण्यासाठी जागा जास्त लागते.
काही वाहनचालक बेशिस्तपणे वाहतूक करतात. भोसरीकडून आल्यानंतर पीएमपी बसस्थानकापासून ओळून कुदळवाडीकडे न जाता मध्येच ओळतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. तसेच सर्कल लावलेल्या जाळीला धक्का लागून नुकसान होत आहे. तेथेच पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडील बाजूची जाळी रस्त्याच्या बाजूला कलली आहे. त्यामुळे कुदळवाडी, साने चौकातून येणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जाळीची झाली चोरी
मागील काही दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु संबंधित प्रशासकीय विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तुटलेली जाळी बरेच दिवस तेथे पडून होती. परंतु आता एका ठिकाणची संरक्षक जाळीची चोरी झाली आहे. त्यामुळे कॉर्नवरील जाळी तुटल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जाळीलाच लावले जातात फ्लेक्स
या जाळीला परिसरातील दादा, भाई, नेते त्यांचे हितचिंतक फ्लेक्स लावतात. त्यामुळे वाऱ्याच्या झोताने जाळीवर ताण येत आहे. परिणामी जाळी तुटत आहे. तसेच फ्लेक्समुळे समोरील येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे