मांजरी : गेली तीन दिवस पावसाची संततधार सुरूच असून आज मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द या दोन्हीं गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलाला पाणी टेकले असून पावसाची संततधार अशीच राहिल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहर व उपनगरातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यातील पाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
आज दिवसभरात नदीची पातळी 5 ते 7 फुटांनी वाढली आहे. सध्या पुलाच्या खालील भागाला पाणी टेकले आहे. नदीवरील पूल सबमर्शिबल असल्याने पाण्याची अजून दोन- तीन फूट पातळी वाढल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.