टेबल-टेनिस क्रीडा प्रकारात पुण्याच्या नील मुळ्ये याने सातत्याने सरस कामगिरी करताना आपल्या वयाच्या इतर खेळाडूंपेक्षा खूपच मोठी भरारी घेतली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतही त्याने सब-ज्युनिअर गटात विजेतेपद मिळवताना राष्ट्रीय यशाकडे कूच केली आहे.
राज्य स्पर्धेच्या प्रदीर्घ चाललेल्या अंतिम सामन्यात नीलने अव्वल खेळाडू अमिष आठवलेवर 4-3 (8-11, 11-5, 9-11, 11-4, 10-12, 11-2 व 11-9) अशी मात करत विजेतेपद पटकावले. हा धावफलक अशासाठी दिला की इतक्या लहान वयात इतका प्रदीर्घ सामना खेळण्यासाठी लागणारी जिद्द व शारीरिक तंदुरुस्ती नीलने आश्चर्यकारकरीत्या जपली आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी त्याने या खेळाचे धडे आपले वडील व प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्याकडे घ्यायला सुरुवात केली. आज तो पुण्यातील मानांकीत खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानावर आहे. केवळ सात वर्षांतच त्याने ही झेप घेतली आहे. नीलचे वडील उपेंद्र हे माजी राष्ट्रीय विजेते असून शिवछत्रपती पुरस्कार विजेतेही आहेत. नील त्यांच्याच मार्गदशर्नाखाली या खेळाचे बारकावे शिकत आहे. शारदा सेंटरमध्ये तसेच पीवायसी क्लबमध्ये नील सातत्याने सराव करतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो कामगिरीत सातत्य राखताना दिसत आहे. अतिशय लहान वयात त्याची खेळासाठीची आस्था वाखाणण्याजोगी आहे. मध्ये एकदा त्याच्या पायाला दुखापत झाली होती तसेच त्याच्या दातांची देखील ट्रीटमेंट झाली होती व वैद्दकीय तज्ज्ञांनी त्याला आराम करण्यास सुचविले होते. मात्र त्याने कोणाचेही ऐकून न घेता चक्क एका स्पर्धेत भाग घेतला व त्यात विजेतेपदही मिळविले, हीच त्याची वृत्ती येत्या काळात त्याला आणखी वरच्या स्तरावर घेऊन जाणार आहे. हा डावखुरा खेळाडू खेळ मात्र अतिशय आक्रमक करतो.
मुळातच क्रिकेटपटूंप्रमाणे डावखुऱ्या खेळाडूंची शैली नेत्रदीपक असते तशीच नीलची देखील आहे. शारीरिक उंची कमी असली तरी त्याची कामगिरी मोठी होत आहे. अंगात विजेची चपळाई असून त्याच्याच जोरावर तो टेबल लीलया कव्हर करतो. त्याने कॅडेट गटात तसेच दहा वर्षांखालील गटात गेल्या मोसमात एकूण पंधरा स्पर्धा खेळताना तेरा वेळा विजेतेपद जिंकताना आपला दर्जा सिद्ध केला आहे. हा त्याचा एक विक्रमच ठरला आहे. या गटात त्याला केवळ दोनदा पराभवाचा सामना करावा लागला मात्र, इथेच त्याच्या यशाची टक्केवारी आचंबित करते. मीलेनीयम शाळेत शिकत असला तरी शिक्षणाबरोबरच त्याचे खेळातील नैपुण्य लहान वयातच इतर खेळाडूंपेक्षा निराळे आहे. त्याने पुण्याचे नाव उंचावताना पश्चिम बंगाल लीगमध्ये देखील सहभागी होताना पदक जिंकले व अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये पुण्याचे नाव नोंदविले.
सात जुलै 2007 मध्ये जन्मलेला नील आज सातवीत शिकत आहे. त्याची अभ्यासात फारशी चांगली कामगिरी नसली तरी वर्ष वाया जाणार नाही इतपत ग्रेड तो सातत्याने मिळवत आहे. वडीलच प्रशिक्षक असल्याने त्याच्या घरी क्रीडासंकृतीचा वारसा आहे. या खेळाची पॅशनच त्याला इतर खेळाडूंपेक्षा निराळा ठरविते. उंची कमी असताना देखील शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर तो सामन्यात अन्य खेळाडूवर दडपण आणण्यात यशस्वी ठरतो. येत्या काळात त्याला शारीरिक तंदुरुस्ती आणखी वाढवावी लागणार असून स्टॅमिना देखील वाढवावा लागणार आहे. येत्या काळात त्याला जिल्हा परिषदेच्या तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी व्हायचे असून त्यासाठी तो कसून सराव करत आहे. त्याचा टेबल रीच सामन्यागणिक वाढताना दिसत असून त्याच्याकडे टेबल टेनिसची नवी गुणवत्ता म्हणून पाहिले जात आहे. नीलसारखे खेळाडू खेलो इंडिया तसेच राष्ट्रकुल व आशियाई स्तरावर येत्या काळात असेच यश मिळविताना दिसले तर नवल वाटणार नाही. आताच त्याने मिळविलेली पदके मोजण्यासाठी दोन्ही हातांची बोटे अपुरी पडतात.
नीलची आई नृत्यशिक्षिका असून त्यांचा देखील नीलला पाठिंबा असतो. चेंडूवरील ताबा तसेच अंडरस्टॅंडींग चांगले असून सरावापेक्षाही तो प्रत्यक्ष सामन्यात जास्त चांगला खेळतो. जिल्हा पातळीवर त्याने आजवर अनेक पदके मिळविली आहेत तर राज्य स्तरावर दोन विजेतीपदे प्राप्त केली आहेत. या स्तरावर तो यापूर्वी तीनवेळा अंतिम सामन्यात खेळला मात्र तीनही वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा मात्र त्याने हे अपयश पुसून काढताना विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा मुंबईत झाली व त्याने मोठ्या खेळाडूंनाही मागे टाकताना आश्चर्यकारक कामगिरी केली. राष्ट्रीय शालेय स्तरावर त्याने यंदा रजतपदक जिंकले असून खुल्या सांघिक गटातही त्याने रजतपदकाची कमाई केली आहे. चंदीगड येथे झालेल्या बारा वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने मानांकीत खेळाडू हृषीकेश शटलरला पराभूत करत आणखी एक विक्रम केला. हा खेळाडू या वयोगटात भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतो त्यामुळे नीलची कामगिरी जास्त महत्त्वाची ठरते. नील आता पंधरा वर्षांखालील गटात पात्र होणार असून त्याची गाठ आता मोठ्या व मानांकित खेळाडूंशी पडणार आहे व इथेच त्याच्या खेळाचा कस लागणार आहे.
त्याच्या खेळातील बारकावे पाहिले तर त्याचा दर्जा मोठाच ठरतो. त्याचा टॉपस्पीन तसेच आक्रमकता चांगली आहे. खेळात सातत्य असून दर स्पर्धेनंतर तो जास्त परिपूर्ण होत आहे हीच त्याची जमेची बाजू आहे. या स्तरावर कॉम्पीटीशन टफ असून इथेच त्याने जर अफलातून खेळ करत विजय प्राप्त केले तर त्याला येत्या काळात या वयोगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. वडिलांचा क्रीडा साहित्य विक्रीचाही जोड व्यवसाय असून तेच नीलचे प्रायोजकही आहेत. याच खेळात नील कारकीर्द करणार असून त्याला शालेय शिक्षणासाठी घरून कोणतेही दडपण लादले जात नाही. जरुरीपुरते शिक्षण घेत त्याने खेळावर जास्त लक्ष केंद्रित करावे व भारतासाठी खेळण्यासाठी कसून सराव करताना विविध स्पर्धेतही यश मिळवावे असे त्याच्या पालकांना वाटते. नीलचा प्रवास याच दीशेने सुरू असून त्याची दिवसेंदिवस प्रगतीच होताना दिसत असून भारताची नवी गुणवत्ता म्हणून तो समोर येईल, असा विश्वास त्याच्या खेळातील सातत्याने मिळत आहे.
– अमित डोंगरे