नगर -जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले. सोनई येथील ऋषीकेश वसंत शेटे असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे हनुमानवाडी येथील त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा लावून पकडले.
स्वीय सहाय्यक राहुल राजळे घरी जात असताना लोहगाव येथे रात्री त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी राहुल राजळे यांचे भाऊ विकास जनार्दन राजळे यांच्या फिर्यादीवरुन नितीन शिरसाठ (रा. वांजोळी ता. नेवासा), बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे (दोघे रा. घोडेगाव ता. नेवासा) व ऋषिकेश शेटे यांच्याविरोधात सोनई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन शिरसाठ याला 24 तासांच्या आत पकडले. दुसरा आरोपी संतोष भिंगारदिवे याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. या घटनेतील अन्य आरोपींचाही शोध सुरू होता.
या दरम्यान फरार असलेला ऋषीकेश वसंत शेटे हा त्याच्या राहत्या घरी हनुमानवाडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकातील गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हनुमानवाडी परिसरात सापळा लावून ऋषिकेश शेटे याला जेरबंद केले.ऋषीकेश शेटे याच्यावर याआधी सोनई पोलीस ठाण्यात 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोळीबार प्रकरणात गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.