ऋषिकेश पवारांनी मागितली विधानसभेची उमेदवारी

शरद पवारांकडून सबुरीचा सल्ला : उपस्थित इच्छुकांच्या भुवया उंचावल्या

राजगुरूनगर – वडगाव घेनंद (ता. खेड) येथे स्व. नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास खेड-आळंदी मतदारसंघातील सर्व इच्छुकांना स्व. नारायण पवार यांचे नातू ऋषिकेश पवार यांनी बोलावले होते. या सर्वांसमोर ऋषिकेश पवार यांनी त्यांच्या भाषणात स्व. नारायणराव पवार यांचा राजकीय वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

ऋषिकेश पवार यांच्या मागणीवर शरद पवार म्हणाले की, ऋषिकेश जरा सबुरीने घे, अशा गोष्टी फारशा चार चौघांत बोलायच्या नसतात. खासगीत विचारायच्या असतात. अगदी नारायणराव पवार यांची गादी चालवली पाहिजे, असे नाही. नारायणरावांचा स्वभावही असाच होता. तेही अशीच भूमिका आणि निर्णय घ्यायचे. चौकटीच्या बाहेरील गोष्टी ते पुढे आणायचे; मात्र जो लोकांमध्ये असतो, त्याला लोकांचा पाठींबा, विश्‍वास असतो. त्यावेळी असे निर्णय घेतले जातात, असे त्यांनी नमूद केले.

ऋषिकेश पवार म्हणाले की, लहान वयात नारायणराव पवार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तालुक्‍यातील जनतेसाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले. हे मी प्रत्यक्ष पाहत अनुभवले आहे. राजकारणात अनेक लोक पाहिले; मात्र अप्पांनी राजकीय वारसदार कधी निर्माण केला नाही. खेड तालुक्‍यात फिरत असताना अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. खेड तालुक्‍यात अनेक युवक बेकार आहेत. तालुक्‍यात इंडस्ट्री आली; मात्र नोकऱ्या मिळत नाहीत, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा प्रश्‍न आहे. त्यावर बंदी आली. पहिली शिवजयंती नारायणराव आप्पांनी भरवली होती; मात्र त्यानंतर बैलगाडा शर्यतीवर सरकारने बंदी आणली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. नारायणराव अप्पांचे कार्य तालुक्‍यात पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे.

पवार साहेब मीपण तुमचाच नातू…
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 31 हजार मतदार आहेत. त्यातील 80 हजार मतदार तरुण आहे. यांचा विचार करणे गरजेचे आहे. खेड तालुक्‍याचा आदर्श अप्पांनी दाखवून दिला आहे. शरद पवार यांचा हात, साथ आणि नेतृत्व अप्पांना लाभले. तसेच मलाही लाभावे. म्हणून पवार साहेब, मी पण तुमचा नातू आहे. रोहित पवार यांच्यासमवेत मला विधानसभेत जाण्याची संधी द्यावी, अशी भावना ऋषिकेश पवार यांनी केली.

नागरिक ऋषिकेशला साथ देतील…
पक्षातील सर्वजण एकत्र बसून उमेदवारीबाबत निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहायचे असते. मला खात्री आहे की तालुक्‍यातील नागरिक ऋषिकेशला साथ देतील, असे शरद पवार यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)