मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल पहायला मिळाले आहेत. पुरुष क्रिकेट संघासोबतच आता महिला क्रिकेट संघ व्यवस्थापनामध्येही बदल केले जात आहेत. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाची जबाबदारी आता ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर रमेश पोवार यांच्याकडे एनसीए ( NCA )ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऋषिकेश कानिटकर हे टीम इंडीआयसोबत जोडले जातील, अशी घोषणा बीसीसीआयने ( BCCI ) केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघांचे हेड कोच असलेले रमेश पोवार यांच्याकडे एनसीए म्हणजे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची ( NCA ) जबादादरी देण्यात आली असून आता ते अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासोबत काम करतील. पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात अपयशी ठरल्याने बीसीसीआयने खेळाडूंपासून ते संघव्यवस्थानापर्यंत अनेक बदल केले आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयने भारतीय क्रिकेटची निवड समितीदेखील बरखास्त केली आहे.
महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर हृषीकेश कानिटकर म्हणाले की, “महिला क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला वाटते की या संघातील खेळाडूंमध्ये चांगली क्षमता असून संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे. मला खात्री आहे की हा संघ पुढील आव्हानांसाठी पूर्णपणे तयार आहे. आमच्यासमोर पुढील काळात काही महत्वाच्या स्पर्धा आहेत ज्या संघासाठी आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी रोमांचक असणार आहे.”
🚨 NEWS 🚨: Hrishikesh Kanitkar appointed as Batting Coach – Team India (Senior Women), Ramesh Powar to join NCA
More Details 🔽https://t.co/u3Agagamdd
— BCCI (@BCCI) December 6, 2022
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची ( NCA ) जबाबदारी आल्यानंतर रमेश पोवार म्हणाले की,”महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ भरभराटीचा राहिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही देशासाठी या क्रिकेट खेळात अनेक दिग्गज प्रतिभावान खेळाडूंसोबत काम केले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत माझ्या नवीन भूमिकेत मी पुढील काही वर्षांमध्ये उत्कृष्ट काम करण्यास उत्सुक आहे.”