वाल्हे, (वार्ताहर) – आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी मंदिर असलेल्या वाल्हे (ता.पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी स्थळाला ऋषीपंचमी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, दिवसभरात शेकडो महिलांनी दर्शन घेऊन, उपवास उद्यापनास हजेरी लावून, वाल्मिकी ऋषींच्या पादुकांना अभिषेक केला.
पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथे ऋषींचे एकमेव स्थान आहे.या ठिकाणी वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी असून,जवळच सात रांजण नावाने रामायणातील प्रसिद्ध डोंगर आहे. ऋषी पंचमी निमित्त राज्यातील विविध भागातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी येत असतात.
तसेच वाल्मिकींच्या मूर्तीला व पादुकांना जलअभिषेक घालण्यासाठी महिला भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने महिलांना अंघोळीची व्यवस्था करण्यात आली होती.
तर अभयकाका देशपांडे व सचिनकाका देशपांडे यांनी येणार्या प्रत्येक महिलेच्या हस्ते पादुका अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी परिसरात पुजेच्या साहित्याची दुकाने सजली होती.
महिलांनी समाधी स्थळाला भेट देत विधिवत पूजा करून समाधी मंदिर परिसरातील झाडाखाली उपवास सोडले. यावेळी महर्षि वाल्मिकी ऋषी समाधी मंदिराचे पुजारी बबन महाराज भुजबळ यांच्या हस्ते अभिषेक घालून, विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी माजी सरपंच अमोल खवले, उद्योजक मोहन पवार, राजेंद्र काळंगे,
हनुमंत पवार, स्वप्निल सासवडे, शिवाजी पवार, अल्लाद पवार, उत्तर बुनगे, संजय खवले, रुपेश भोसले, राजेंद्र रोकडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दुरक्षेत्रातील सहायक उपनिरीक्षक केशव जगताप, पोलीस हवलदार भाऊसाहेब भोंगळे, पोलीस नाईक प्रशांत पवार आदींनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.