“खुल्लम खुल्ला प्यार’ करणारा ऋषी कपूर

करोनाच्या शिखरावरच्या कालखंडात मागील वर्षी 30 एप्रिलला विख्यात संवेदनशील अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काही संदर्भ…

– श्रीकांत ना. कुलकर्णी

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले व हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला. आपल्या जिंदादिल प्रवृत्तीनुसार ऋषी कपूर गेली दोन वर्ष कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी झुंज देत होते. मात्र, शेवटी काळाने त्यांच्यावर मात केलीच. “लॉकडाऊन’च्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांना बसलेले हे दोन धक्के कधीच विसरता येणार नाहीत. इरफान खान हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले होते; मात्र त्यांनी आपल्या सकस अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

ऋषी कपूर यांचे मात्र तसे नव्हते. अभिनयाची परंपरा असलेल्या कपूर या बॉलिवूडमधील बड्या खानदानाचे ते एक समर्थ वारसदार होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अगदी सहज सुलभ प्रवेश केला. मात्र, नंतर आपल्या अभिनयाच्या जोरावरच त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवले आणि अमिताभ बच्चनसारख्या दिग्गज अभिनेत्यालाही चांगली टक्कर देत आपले स्टारडमही कायम ठेवले.

अभिनेता म्हणून ऋषी कपूर ही कपूर घराण्याची तिसरी पिढी होती. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर हे ऋषी कपूर यांचे वडील तर ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर हे त्यांचे आजोबा. अगदी लहान वयात ऋषी कपूर यांनी “मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्याने बालवयातील राज कपूरची भूमिका केली होती. त्यानंतर कोवळ्या वयातच राज कपूर यांच्याच “बॉबी’ या चित्रपटाद्वारे ते नायक बनले. “मैं शायर तो नही’ असे म्हणणारा या चित्रपटातील ऋषी कपूर यांनी रंगवलेला कोवळा नायक प्रेक्षकांना अधिक भावला आणि आपला पहिलाच चित्रपट गाजविण्याचे भाग्य ऋषी कपूर यांना लाभले.

वास्तविक ऋषी कपूर यांच्या आधी त्यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनीही चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यांचे काही चित्रपट चाललेही. मात्र त्यांना फार काळ स्वतःचे अस्तित्त्व टिकविता आले नाही. लवकरच दिग्दर्शक बनत त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला. शिवाय केवळ राज कपूर यांच्यामुळे ऋषी कपूर यांचे कनिष्ठ बंधू राजीव कपूर यांचीही पडद्यावर नायक म्हणून एन्ट्री झाली. मात्र काही चित्रपटानंतर त्यांनीही अन्य व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. ऋषी कपूर यांनी मात्र शेवटपर्यंत “नॉट आऊट’ राहून कपूर खानदानाची अभिनयाची परंपरा कायम ठेवली. आता त्यांचे चिरंजीव रणबीर कपूर हेदेखील त्यांचे वारसदार बनून अभिनयाची परंपरा चालवत आहेत.

ऋषी कपूर यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला तो काळ होता एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या राजेश खन्नाचा. त्यानंतर “शहेनशाह’ बनलेल्या अमिताभ बच्चन या अभिनेत्याचे गारुड संपूर्ण चित्रपटसृष्टीवर पसरू लागले होते. ऋषी कपूर यांचे व्यक्तिमत्त्व मात्र ऍक्‍शन फिल्मला साजेसे नव्हते. निरागस हसऱ्या चेहऱ्याचा रोमॅंटिक नायक हीच प्रतिमा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी होती व ती त्यांनी शेवटपर्यंत कायम टिकविली.

त्यामुळे “अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ इतकाच “खुल्लम खुल्ला प्यार’ करणारा त्यांचा रोमॅंटिक हिरो प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे त्यांनी अभिनय केलेले जवळजवळ सर्वच चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट झाले. मग तो “कर्ज’ असो “दिवाना’ असो की “चांदनी’. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर काम करताना ऋषी कपूर यांनी त्यांनाही जोरदार टक्कर दिली. त्यामुळे “अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात ऋषी कपूर यांचा “अकबर’ ही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. सुरुवातीच्या काळात पडद्यावर नीतू सिंग या नायिकेबरोबर त्यांची खुपच छान जोडी जमली. पुढे वास्तव जीवनातही नीतू सिंग त्यांची नायिका (सहधर्मचारिणी) झाली.

वय वाढत गेले तसतसे ऋषी कपूर यांनी आपल्या सेकंड इनिंगमध्ये विविध स्वरूपाच्या भूमिका करायला सुरुवात केली होती. “अग्निपथ’ मध्ये त्यांनी चक्क खलनायकाची भूमिका बजावली. तर “कपूर अँड सन्स’ तसेच ‘100 – नॉट आऊट’मध्ये (अमिताभचा मुलगा) त्यांनी वृद्धाची भूमिका खूप छान निभावली होती. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे जिंदादिल वृत्ती असलेल्या एका चांगल्या अभिनेत्याचा अस्त झाला आहे. यापुढे, स्वतंत्र प्रतिमा असणारा खानदानी अभिनेता अशीच त्यांची हिंदी चित्रपट सृष्टीत कायम ओळख राहील.

“खुल्लम खुल्ला’चा दुसरा भाग यायला हवा…
– श्रीनिवास वारुंजीकर

दोन वर्षांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ऋषी कपूर यांच्या “खुल्लम खुल्ला – ऋषी कपूर अनसेन्सॉर्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते. त्यावेळी लंडन विद्यापीठाच्या संस्कृत विभागप्रमुख राचेल ड्‌वायर यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली होती. त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणातली तरुणाईची गर्दी पाहून ऋषी कपूर गोंधळात पडले होते.

“बहुधा संयोजकांनी रणबीर कपूर येणार, असे जाहीर केले असावे. त्यामुळे इतक्‍या तरुणांची गर्दी झाली असेल, असे मला वाटते,’ असे सांगून ते म्हणाले होते की, “मी मागच्या पिढीचा अभिनेता असूनही तुम्ही जर इतकी गर्दी केली असेल, तर तो माझ्या अभिनयाचा गौरव आहे, असे मी समजतो.’ त्या मुलाखतीमध्ये कपूर यांनी असेही सांगितले होते की, हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये कपूर कुटुंबीयांच्या चार पिढ्यांनी योगदान दिले आहे. म्हणजे या शतकोत्तर इतिहासाच्या 80 टक्के कालखंडावर कपूर घराण्याची नाममुद्रा आहे.

त्यानंतर दै. प्रभातशी बोलताना त्यांना याबाबत छेडले होते. कपूर घराण्याच्या चार पिढ्यांपैकी किमान 20 ते 24 जणांनी हिंदी सिनेसृष्टीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिले आहे. त्या सर्वांमधील आत्मचरित्र लिहिणारे तुम्ही पहिले आणि एकमेव गृहस्थ आहात. याचाच अर्थ या कालखंडाविषयी आणखीही बरेच संदर्भ आपल्याकडे असतील. त्यामुळे “खुल्लम खुल्ला’चा दुसरा भाग प्रकाशित करणार का, असे विचारले असता, कपूर यांनी “खरे तर या पुस्तकाचा दुसरा भागही लिहायला हवा’ असे मान्य केले होते.

सर्वाधिक अभिनेत्री लॉन्च करण्याचा विक्रम ऋषी कपूर यांच्या नावे
बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्रींच्या लॉन्चविषयी अनेकदा चर्चा रंगत असते. यात सलमान खानने अनेक अभिनेत्रींना सिनेसृष्टीत संधी दिल्याचे सांगितले जाते. पण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक अभिनेत्री लॉन्च करण्याचा विक्रम ऋषी कपूर यांच्या नावे आहे. ऋषी कपूर यांच्यासमवेत 20 हून अधिक अभिनेत्रींनी त्यांच्या करिअर सुरू केली आहे. यात डिंपल कपाडिया, जयाप्रदा, गौतमी कपूर अशी नावे आहेत, ज्यांनी नंतर इंडस्ट्रीत एक विशिष्ट उंची गाठली.

ऋषी कपूर यांच्याबरोबर लॉन्च होणारी पहिली अभिनेत्री आहे डिंपल कपाडिया. डिंपलने तिच्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये “बॉबी’ चित्रपटाने केली होती. नायकाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली होती. डिंपल तेव्हा फक्त 16 वर्षांची होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.

डिंपलनंतर काजल किरणने 1977 मध्ये “हम किस से काम नहीं’ या चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. यानंतर तिला सुमारे 20 चित्रपटांत नायिका म्हणून साईन करण्यात आले होते. यानंतर शोमा आनंदने तिच्या करिअरची सुरुवात “डायनामाइट’पासून पासून केली आणि “कुली’सारख्या हिट चित्रपटात ती ऋषी कपूर यांच्या समवेत झळकली होती.

त्याचप्रमाणे भावना भट्टने “दो जासूस’, तर जयाप्रदाने “सरगम’ या पहिल्या हिंदी चित्रपटात ऋषी कपूर यांच्या समवेत भूमिका साकारल्या होत्या. जयाप्रदाने “सिंदूर’, “घर घर की कहानी’, “घराना’, “प्यारा घर’, “धरतीपुत्र’ यासारख्या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासमवेत नायिकेच्या भूमिका साकारल्या. यानंतर इंडस्ट्रीमध्ये जयाप्रदा आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.

तमिळ स्टार राधिकाने हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्याचा विचार केला तेव्हा नायक म्हणून तिने ऋषी कपूर यांनाच पहिली पसंती दर्शविली होती. या दोघांनी “नसीब अपना अपना’मध्ये एकत्रित काम केले होते. नसीमने आपल्या कारकिर्दीत एकच चित्रपट केला, तोही ऋषी कपूर यांच्यासोबत. “कभी कभी’मध्ये ती अमिताभ आणि वहीदाच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर नसीम ही ऋषी कपूर यांच्या प्रेमात पडली होती. परंतु ऋषी कपूर अगोदरपासूनच नीतू सिंग यांच्या प्रेमात पडले होते.

“सांभर सालसा’मध्ये प्रियांका, तर “लैला मजनू’मध्ये रंजीताने ऋषी कपूर यांच्यासमवेत आपल्या करिअरची सुरुवात केली. “चांदनी’ चित्रपटातून मीता वशिष्ठ, “नकाब’मधून गौतमी, तर “हिना’मधील जेबा बख्तियार आणि अश्‍विनी भावे असो की “दरार’मधील शीला शर्मा, “कुछ तो है’मधून नताशापर्यंत अनेक अभिनेत्रींनी ऋषी कपूर यांच्याबरोबर पदार्पण केले.
इंडस्ट्रीत सुमारे 30 वर्षे काम केल्यानंतरही त्यांच्याबरोबर बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी अभिनेत्री उत्सुक होत्या.

“विजय’ चित्रपटात सोनमने, तर कुसुमित सनाने “कुछ तो है’मधून करिअरची सुरुवात केली होती. तसेच “फना’ चित्रपटातून गौतमी कपूरने पदार्पण केले होते. यात आमिर खान-काजल व्यतिरिक्त ऋषी आणि गौतमी कपूर मुख्य भूमिकेत होते. तसेच “फना’मधून सनाया इराणीनेही आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.