ऋषभ पंतला विक्रमांची संधी

मुंबई  -भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपल्या नावावर नव्या विक्रमांची नोंद करण्याची संधी मिळाली आहे. पंत यंदाच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत असून गेल्या वर्षी त्याला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या वर्षा मात्र, त्याने सातत्याने सरस कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये पंतने आपल्यावरील टीका मागे टाकली व अफलातून कामगिरी करत या दोन्ही मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. आता तो आयपीएल स्पर्धेतही सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदाच्या स्पर्धेतही त्याचा फॉर्म टीकून राहिला तर त्याला अनेकानेक विक्रम साकार करण्याची संधी चालून आली आहे.

आयपीएलमध्ये पंतच्या नावावर 2 हजार 79 धावा असून राहुल द्रविड (2 हजार 174), सचिन तेंडुलकर (2 हजार 334), जॅक कॅलिस (2 हजार 427) या दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याची त्याला नामी संधी आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये 25 चौकार फटकावण्यात त्याला यश आले तर त्याच्या नावावर 300 चौकारांचा विक्रम जमा होईल.

आयपीएलबाबत बोलायचे तर 200 चौकार पूर्ण करण्यासाठी त्याला 17 चौकारांची गरज आहे. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली संघाकडून 200 चौकार ठोकणारा पंत केवळ दुसराच खेळाडू ठरेल. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने 266 चौकार फटकावले आहेत.

आयपीएलमध्ये 4 झेल घेतले तर पंतच्या नावावर झेलांचे अर्धशतक नोंदले जाणार असून त्यासाठी त्याला 7 झेल घेण्याची आवश्‍यकता आहे. अशी कामगिरी केली तर दिल्ली संघाकडून 50 झेल घेणारा पंत हा पहिलाच यष्टीरक्षक ठरेल. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी पंतकडे सोपवण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.