दुबई – आयसीसीने नव्याने सुरू केलेल्या महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पहिल्या पुरस्कारासाठी भारताच्या ऋषभ पंतला अंतिम नामांकन मिळाले असून, पुरस्कारासाठी त्याची इंग्लंडच्या ज्यो रूट व आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.
आयसीसीने या वर्षीपासून क्रिकेटच्या तीन प्रकारातील एकत्रित कामगिरीवरून महिन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार सुरू केला आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंतला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तिसरी सिडनी कसोटी अनिर्णित राखताना त्याने 97 धावांची खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने नाबाद 89 धावा केल्या होत्या. दुसरीकडे इंग्लंडच्या ज्यो रूट याने श्रीलंकेविरुद्ध 2-0 अशा इंग्लंडच्या मालिका विजयात 228 आणि 186 धावा अशी दोन शतके झळकाविली होती.
नामांकन मिळालेला तिसरा खेळाडू स्टर्लिंग याने अमिरातीविरद्ध दोन आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन असे पाच एकदिवसीय सामने खेळताना तीन शतके झळकाविली. महिला विभागासाठी पाकिस्तानची डायना बेग आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल आणि मारिझने कॅप यांनाही नामांकन मिळाले आहे. आयसीसीच्या वतीने अंतिम पुरस्काराची घोषणा त्यांच्या डिजिटल चॅनेलवरून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्यात येणार आहे.