निवड न झाल्याचे शल्य मनात होते – ऋषभ पंत

जयपुर : ऋषभ पंतच्या आक्रमक 78 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सवर 6 गडी राखून मात केली. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. राजस्थानने दिलेलं 192 धावांचं आव्हान दिल्लीने ऋषभ पंतच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. पंतने आपल्या 78 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मात्र या खेळीदरम्यानही ऋषभच्या मनात विश्वचषक संघात निवड न झाल्याचं दुःख सलत होतं. खुद्द पंतनेच याची कबुली दिली आहे.

मी सध्या आनंदात आहे. तुमच्या खेळीमुळे संघ विजयी होतो ही भावना खूप आनंद देणारी असते. मी खोटं बोलणार नाही, या खेळीदरम्यानही माझ्या डोक्‍यात विश्वचषक संघात निवड न झाल्याचं दुःख सलत होतं. मात्र मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं आणि त्याचा मला फायदा झाला. खेळपट्टीकडून चांगली मदत मिळत होती आणि मी त्याचा फायदा घेतला. आमच्या संघात प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. ऋषभ पंतने आपली व्यथा मांडली.

30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक संघासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीला पर्याय म्हणून निवड समितीने पंत ऐवजी कार्तिकला पसंती दिली. या निर्णयावर अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे भविष्यकाळात ऋषभ पंतच्या आयपीएलमधल्या खेळींकडे सर्वांचं लक्ष असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.