नवी दिल्ली -ऋषभ पंतला बीसीसीआयने भारत अ संघात स्थान दिले असुन भारतीय संघ विंडिज अ संघाविरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळेल. आगामी विंडीज आणि श्रीलंका अ संघाविरुद्ध सामन्यांसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. यामध्ये विंडीज अ संघाविरुद्ध 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पंतला संघात स्थान देण्यात आलेलं आहे. मनिष पांडे विंडीज अ संघाविरुद्घ भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे.
याव्यतिरीक्त 2018 वर्षात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या वृद्धीमान साहानेही पुनरागमन केले आहे. विंडीजविरुद्ध दोन दिवसीय कसोटी सराव सामन्यासाठी साहाची यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे. साहाच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने कसोटी संघात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली होती. वन-डे विश्वचषकानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सराव सामन्यांमधून छाप पाडत साहा कसोटी संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.