Test Cricket :- महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीचे सर्व करंडक जिंकण्याच्या पराक्रम केला होता. मात्र धोनीनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी कुणाला तरी वेळ द्यावा लागेल, असे वाटत असताना ऋषभ पंत संघात दाखल झाला. त्याने आपल्या खेळाच्या जोरावर धोनीची पोकळी भरून काढली, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.
पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर तो कसोटी संघात स्थिरावला. त्याने 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी केली. गब्बा येथे चौथ्या कसोटीमध्ये दमदार 89 धावांची खेळी करताना भारताला 2-1अशी मालिका जिंकून दिली. या मालिकेत त्याने 274 धावा करताना भारताच्या विजयात मोठा हातभार लावला होता. मात्र डिसेंबर 2022 मध्ये त्याचा मोठा अपघात झाल्यानंतर तो तब्बल वर्षभराने मैदानात उतरला. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करताना राष्ट्रीय संघात यशस्वी पुनरागमन केले.
या संदर्भात बोलताना राहुल द्रविड म्हणाले, मी असे म्हणत नाही की पंतने धोनीची जागा घेतली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पंतची कामगिरी नक्कीच चमकदार आहे. गब्बामध्ये संघ पराभवाच्या छायेखाली असताना त्याने जिगरबाज 89 धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला होता. दबावाखाली असताना अशा प्रकारची कामगिरी करणे अगदी विलक्षण असल्याचे द्रविड यांनी सांगितले. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, पंतने पाच डावांत दोन अर्धशतके झळकावली होती. त्या विजयामुळेच ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ बनला.
होय… आम्ही जिंकू शकलो नाही…
भारताने 2014-15 पासून बॉर्डर-गावस्कर करंडकावर वर्चस्व गाजविले आहे. यावेळी बोलताना राहुल द्रविड यांनी 2003 मधील ॲडलेड कसोटीची आठवण काढली. या लढतीत त्याने 233 धावांची खेळी केली होती. मात्र, भारताला ती मालिका जिंकता आली नव्हती. द्रविड म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील मागील दोन मालिकांमध्ये भारताची कामगिरी दमदार राहिली आहे. ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे नक्कीच विशेष असते. आम्हाला देखील संधी होती. मात्र आम्ही जिंकू शकलो नाहीत. आम्हाला शेवटच्या दिवशी बळी मिळविता आले नाहीत, याची खंत असल्याचे ते म्हणाले.