खेड तालुक्‍यात पुन्हा “पवार पर्वाचा उदय’

वडगाव घेनंद येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्या भाषणाकडे लक्ष

– रामचंद्र सोनवणे

राजगुरुनगर – खेड तालुक्‍यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत. या घडामोडीत पुन्हा “पवारपर्व’ सुरु होणार असल्याची मोठी चर्चा सुरु आहे. स्व. नारायणराव पवार यांनी तब्बल चार वेळा तालुक्‍याचे आमदार पद भूषवले. मात्र त्यानंतर दिलीप मोहिते आणि सुरेश गोरे यांनी पवार घराण्याचे आमदारकीचे नाव पुसले. आता पुन्हा पवार पर्वाला सुरुवात होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

स्व. नारायणराव पवार यांचे नातू ऋषिकेश पवार, कन्या प्रिया पवार आणि त्यांचे कट्टर समर्थक अमोल पवार यांची राजकीय कारकीर्द जोमात सुरु झाली आहे. येत्या रविवारी स्व. नारायणराव पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याने या कार्यक्रमात पवार पर्वाची खरी खुरी सुरुवात होणार आहे. शरद पवार या कार्यक्रमात नक्की काय बोलणार, आगामी विधानसभा निवडणुकीत स्व. नारायण पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांचे नाव घोषित करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खेडच्या राजकारणात ऋषीकेश पवार यांनी अगदी कमी वयात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करीत असताना त्यांनी तालुका युवा अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, नेते अजित पवार या नेत्यांसोबत त्याचे घनिष्ट संबंध आहेत. ऋषिकेषचे आजोबा यांनी शरद पवार यांच्या सोबत काम केले. त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यात हरित क्रांती घडविली. मात्र त्याच्या निधनानंतर पवार कुटुंब राजकारणापासून काहीसे दुरावले होते. अप्पांचा मुलगा रमेश पवार हे बाजार समितीचे सभापती झाले. त्यानंतर त्यांचे नाव विधानसभा निवडणुकीसाठी त्यावेळी पुढे आले होते.

रमेश पवार यांच्या नंतर आजोबा आणि वडिलांच्या राजकीय वारसाने ऋषिकेश पवार यांनी राजकारणात उभारी घेत युवकांचे मोठे संघटन केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष आहे. नुकतेच पक्ष नेत्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच केल्याने यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऋषिकेश पवार यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असली तरी रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात ऋषिकेशच्या उमेदवारी घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषिकेशला राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली तर पवार पर्वाचा पुन्हा उदय होणार हे निश्‍चित आहे.

रविवारी (दि. 28) स्व. नारायणराव पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्टवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे तालुक्‍यात सर्वत्र महत्त्वाच्या जागांवर आणि गावागावात होर्डिंग झळकत आहेत. तालुक्‍यात पवार घराण्यातील तीन युवा नेतृत्व पुढे आल्याने पुन्हा परिवर्तन अटळ असल्याची सध्या मोठी कुजबुज सुरु आहे. या होर्डिंगवर ऋषिकेश, प्रिया आणि अमोल पवार यांचे फोटो असल्याने खेडच्या राजकारणात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमोल पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
तालुक्‍यात स्व. नारायणराव पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे खंदे समर्थक अमोल पवार, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. ते अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मागील निवडणुकीत तालुक्‍यात परिवर्तनाची लाट आली. यात प्रमुख भूमिका अमोल पवार यांनी निभावली. माजी आमदार दिलीप मोहिते यांचे वर्चस्व रोखण्यासाठी तालुक्‍यातील सर्व विरोधकांचे संघटन करून सुरेश गोरे हे नवे आमदार मिळवून दिले. मागील विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्यात अमोल पवार यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे तालुक्‍यातील एक युवा नेतृत्व व माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.