– परिज्ञा पुरी
मी स्वतः छंद म्हणून लॅटिन डान्स करते ज्यात तोकडे कपडे घालणं, हा त्या नृत्याच्या स्टेज परफॉर्मन्सचा एक भाग आहे. कधी बॉलिवुड तर कधी हिप हॉप. पण त्यातही शक्य तितके अंग झाकले जावे, असे कॉस्च्युम्स डिझाईन केले जातील, याकडे माझा कल असतो. आवड म्हणून अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणे न घालणे, हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.
तर विषय रिप्ड जीन्सचा आहे. ज्यांना आवडतील त्यांना घालण्यापासून आपण रोखू शकत नाही. पण आपले कपडे हा आपल्या आचाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आपला आचार हा आपल्या मनातील विचारांचे प्रतिबिंब आहे. मनातील विचार हे संस्कारांवर – केवळ आईवडिलांनी दिलेल्या नाही तर पूर्ण समाजाने दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतात. तेव्हा, जर आपण दैनंदिन जीवनात अगदी रस्त्यावरून चालत जात असतानाही, बसने किंवा लोकलने, जिथे खच्चून गर्दी असते किंवा जिथे सहज आपल्याला कोणीही स्पर्श करेल अशा ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरतानाही अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत असू, तर आपण आपली सदसद्विवेकबुद्धी फॅशनच्या आहारी जाऊन गहाण ठेवली आहे, असे मला खेदाने म्हणावे लागेल.
समाजाचा निकोप समतोल राखणं, हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. कृपया इथे हे कोणीही सांगायला येऊ नये की पुरुषांच्या वाईट नजरा दोन दिवसांच्या तान्ह्या बाळाला किंवा ऐंशी वर्षांच्या म्हातारीलाही सोडत नाहीत. तो मुद्दाच नाहीये इथे. कारण ज्याला बलात्कार करायचा असतो, तो करणारच, तिथे कायदाही आड येत नाही आणि कपडेही. पण म्हणून समाजातील समस्त पुरुषांच्या सज्जनतेची परीक्षा पाहण्याचा अधिकार स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य या गोंडस नावाखाली मिळतो, असं नाही ना!
ज्यांनी शरीरशास्त्राचा थोडा जरी अभ्यास केला असेल तर त्यांना सहज लक्षात येईल की स्त्रियांची आणि पुरुषांची शारीरिक जडणघडण आणि हॉर्मोनल रचना वेगळी असते. जर हे माहीत असेल तर पुरूष कसे बलात्कार करतात आणि स्त्रिया कशा करत नाहीत, असले बावळट प्रश्न पडणार नाहीत. शरीरसुखाची स्त्रियांची गरज ही भावनिक जास्त आणि शारीरिक कमी असते, पुरुषांची प्राथमिक अवस्थेत तरी शारीरिक जास्त असते. तसेच visual stimuli यांचा पुरुषांच्या शरीरसुखाच्या भावना जागृत करण्यात खूप मोठा हात असतो. मग, प्रायव्हेट पार्ट समजल्या जाणाऱ्या भागांचे प्रदर्शन करून स्त्रिया काय साध्य करू इच्छितात?
काही वेळासाठी आपण समजू की आपण एका आदर्श समाजात राहतो आणि कुठलेच पुरूष विकारी मनाचे नाहीत. अशा परिस्थितीतही मग उघड्या मांड्या दाखवणे किंवा खोल गळे असणारे कपडे घालणे किंवा खांदे किंवा उघड्या काखा दाखवणे, याचे काय प्रयोजन असेल बरं? मी किती सुंदर आहे आणि माझी त्वचा किती नितळ आहे किंवा दाखवणेबल आहे, याचा मोह होणे हे अत्यंत साहजिक आहे कुठल्याही स्वतःला सुंदर समजणाऱ्या स्त्रीसाठी. पण तो मोह थांबवून कुठे लक्ष्मणरेषा आखायची, याचा शहाणपणासुद्धा हवा ना! मुळात दुसऱ्या माणसाने आपल्या उघड्या अंगाकडे पाहावं, हा विचार येतो कुठून, हा प्रश्न स्त्रियांनी स्वतःला विचारावा. स्वतःमध्ये exhibitionist tendency का आहे, याचा विचार होणं गरजेचं आहे.
याची आणखी एक बाजू आहे. प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटू शकते पण समस्या गंभीर आहे. आणि ती म्हणजे अनेक sexually active वयोगटातील पुरुषांची कामेच्छा कमी होणे. याला अनेक घटक विशेषतः ताण कारणीभूत आहे. पण एखाद्या गोष्टीचं अजीर्ण होणे, हाही यातला एक महत्त्वाचा भाग आहे. सतत अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की सतत उफाळून येणाऱ्या कामेच्छेला बांध घालावा लागतो. यामुळे प्रत्यक्षात जेव्हा आवश्यकता असते, म्हणजे लग्नाच्या बायकोला सुख देण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा दिवसभर तयार झालेला hormonal feedback mechanism शरीराला त्या गोष्टीसाठी जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तयार होऊ देईलच असं नाही. तेव्हा माणसाला आधी सहज सुलभ असणारी गोष्ट परिणामकारकरित्या काम करेलच असे नाही. जर एखादी गोष्ट सहज रोजच नजरेला पडत असेल तर त्याचं एक तर नाविन्य राहत नाही आणि त्यामुळे जे visual stimulus एरवी काम करेल, ते होणारच नाही. आणि हा मुळीच चेष्टेचा विषय नाही. कुठल्याही वकिलाला विचारा. आजही, शरीरसुखात कमतरता हे घटस्फोटाचं मुख्य कारण आहे. अर्थात याला पॉर्न साईट्सही तितक्याच जबाबदार आहेत, कारण त्याने अवाजवी अपेक्षा वाढत आहेत.
पुन्हा एकदा, विषय रिप्ड जीन्सचा आहे, पण त्याचं मूळ हे रिप्ड मेंटॅलिटीत आहे, असं मला वाटतं. स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्ही हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणखी एक, जी आई स्वतः अंगप्रदर्शन करणारे कपडे घालते, ती तिच्या मुलीला कुठल्या अधिकाराने किंवा कुठल्या तोंडाने सांगणार की कपडे घेताना, घालताना जबाबदारीने वाग म्हणून? आणि मग पुरूष कसे वाईट नजरेचे असतात हे पण त्याच आया सांगणार का?