आंबेगाव तालुक्यातील सदस्यांना न बोलावल्याने व्यक्त केला निषेध
डिंभे – जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या आंबेगाव तालुका पंचायत समिती आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना बोलविण्यात आले. मात्र, पंचायत समिती सदस्यांना बोलविण्यात आले नसल्याने पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, राजाराम बाणखेले यांनी निषेध व्यक्त करत गदारोळ घातला.
आंबेगाव तालुका पंचायत समितीमध्ये गुरुवारी (दि. 11) जिल्हा परिषदेने आंबेगाव तालुका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते. पंचायत समिती सदस्यांनी आढावा बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, पंचायत समिती सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये मान दिला जात नाही किंवा आम्हाला बोलविले जात नाही. तालुक्याचे प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत मांडावेत. पंचायत समिती सदस्याने पंचायत समितीत मांडावेत, असा नियम आहे; पण संबंधित अधिकारी तालुक्यातील बैठकीला आमंत्रण देत नाहीत, अचानक बैठक घेतात. तालुक्यात घेण्यात येत असलेल्या आढावा बैठकीमध्ये आठ पंचायत समिती सदस्यांना बोलविणे अपेक्षित होते, येथून पुढे असे घडू नये, अशी मागणी यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले व राजाराम बाणखेले यांनी केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी यास दुजोरा देत यापुढे पंचायत समिती सदस्यांना बोलविण्यात येईल असे सांगितल्यानंतर आढावा बैठक चालू झाली. या आढावा बैठकीमध्ये माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, रूपाली जगदाळे, तुलसी भोर, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे उपस्थित होते. पंचायत समिती आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण, महिला बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, पशुसंवर्धन, बांधकाम आदी विविध पंचायत समितीअंतर्गत विभागांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.