गणेश पंडित दिग्दर्शित ‘मेकअप’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. १०० टक्के बिनधास्त… १०० टक्के चुलबुली… आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल… असलेल्या ‘पूर्वी’ ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना ‘मेकअप’चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. टिझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकचं वाढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
गणेश पंडित यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे. भन्नाट विषय हाताळण्यात त्याचा हातखंडा असल्याने ‘मेकअप’ मध्येही असेच काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसत आहे.
ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा ‘हॉट’ राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरचं कळेल.