मुंबई – सैराट ‘ सिनेमातील आर्ची या भूमिकेमुळे रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आता ‘मेकअप’ या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ‘मेकअप’ या सिनेमात रिंकू पूर्वी नावाच्या तरुणीची भूमिका साकारतेय. भूमिकेबाबत रिंकू म्हणाली, मेकअप शब्द उच्चारताच चटकन आपल्याला डोळ्यासमोर चेहऱ्यावरची रंगरंगोटी येते.
पण पूर्वीचा मेकअप आहे तो अंतरमनाचा आणि परिस्थितीचा आहे. रोजच्या जीवनात आपणही वेगवेगळ्या परिस्थितीत मुखवटे घेऊन वावरतो. आपल्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण समोरच्याला येऊ देत नाही. अशी साधी सरळ गोष्ट सिनेमात आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रिंकूचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळतोय.
दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरु पुण्यात ‘मेकअप’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला ‘खऱ्या आयुष्यात तुला मेकअप करायला आवडतो का ?’ असे विचारताच क्षणाचाही विलंब न लावता अजिबात नाही, मी सिंपल गर्ल असल्याचे ती म्हणाली . लवकरच रिंकू एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे . पण आताच त्याबद्दल सांगणे घाईचे होईल असे ती म्हणाली .