पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेलेल्या पश्चिम भागातील खेड शिवापूर ते उर्से (ता. मावळ) यादरम्यान रिंगरोड मोजणी पूर्ण झाली आहे. आता या मोजणीचे नकाशे व सद्यस्थितीत शेतामध्ये कोणती झाडे, घरे, विहीर यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्ष कोणती जमीन बाधित होणार आहे, किती क्षेत्र जाणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पश्चिम रिंगरोड हा भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतून जाणार आहे. या रिंगरोडची लांबी 68 किलोमीटर इतकी आहे. तर, 910 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्वत्वास आले. भोर तालुक्यातील एका गावाचे मोजणी काम बाकी आहे. मोजणीचे काम पूर्ण झालेल्या गावातील रिंगरोडचे नकाशे भूमि अभिलेख विभागाकडून एमएसआरडीसीकडे नुकतेच देण्यात आले आहे. याचसह मोजणीवेळी शेतात कोणती पिके आहेत.
कोणती झाडे त्यांची संख्या, शेतात विहिर, बोअरवेल, घर, आदी माहिती नकाशांवर घेण्यात आली आहे. तसेच हद्दी व खुणा सुध्दा दर्शविण्यात आल्या आहेत. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. शेतात असलेली झाडे, घरे, विहिर, बोअरवेल आदी माहितींच्या आधारे शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम निश्चित केली आहे. त्यामुळे रिंगरोड बाधितांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची आहे. यापार्श्वभूमीवर एमएसआरडीसीकडून ही माहिती शेतकऱ्यांना प्रांत कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामाहितीबद्दल शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील अथवा कोणती माहिती नकाशामध्ये अथवा पत्रकात नमूद नसेल त्याबद्दल हरकत नोंदविता येणार आहे.
- या गावांमधून जाणार रिंगरोड
- भोर तालुका – केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे
- हवेली तालुका : रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड,
- सांडवी ब्रुद्रुक, सांगरूण, बहुली.
- मुळशी तालुका : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे,
- आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.
- मावळ तालुका : पाचणे, चांदखेड,बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी उर्से