पुणे – महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना करोना ड्युटी लावल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देवू नयेत या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
करोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मराठी, उर्दू, सेमी इंग्लिश शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षकांना करोना ड्युटी लावली आहे. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शक्य होत नाही.
काही विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, मोबाइल सुविधांमध्ये अडचणी येत आहेत. त्यांना हार्ड कॉपी, वर्क शीट पोहोचविण्याचे कर्तव्य शिक्षकांचे आहे. मात्र, बऱ्याचशा शिक्षकांना ते काम शक्य होत नाही. शिक्षण विभागाने याकडे पाठ फिरविली आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून शाळा प्रशासनाच्या कामावर वॉच ठेवणे आवश्यक आहे. अध्यापनाच्या कामकाजाचा लेखा जोखा तपासूण कामात कसूर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर यांनी महापालिकेकडे केली आहे.