रियाध – सौदीच्या राजघराण्यात बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला असून या बंडात सामिल झाल्याबद्दल तेथील सत्तधाऱ्यांनी आपल्याच घराण्याशी संबंधीत तीन जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजे सलमान यांचे बंधु, त्यांचे पुतणे यांचाही समावेश आहे. त्यांच्यावरच बंडाची आखणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रिंस अहमद बिन अब्दुअझीज अल सौद आणि प्रिंस महंमद बिन नायेफ अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही सौदीच्या राजघराण्याचे संभाव्य वारसदार मानले जात होते. त्यांच्यावर सौदीच्या रॉयल कोर्टाने राजघराण्याच्या विरोधात बंड केल्याचा खटला दाखल केला आहे.
या दोघांच्या अटकेमुळे सौदीच्या राजघराण्यावरील प्रिंस महंमद यांची पकड मजबूत झाल्याचे मानले जात आहे. त्यांनी अनेक मौलवी, प्रिंस, त्यांच्याशी संबंधीत बडे उद्योजक व व्यापारी, या सर्वांनाच अटकेत टाकले आहे. सौदीचे 84 वर्षीय राजे सलमान हे प्रिंस महंमद यांचे वडिल असून त्यांच्याकडील राजघराण्याची सत्ता आता 48 वर्षीय प्रिंस महंमद यांच्याकडे जाईल असे सांगितले जात आहे.