विनाहेल्मेट व विनामास्क बाईक चालवणे विवेकला पडले महागात; मुंबई पोलिसांकडून कारवाई…

मुंबई -विवेक ओबेरॉय सध्या एका व्हिडीओमुळे खूप चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या “व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी हा व्हिडीओ शूट केला गेला होता. त्यामध्ये विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी मोटरसायकलवरून डबल सीट चाललेले दिसत आहेत.

विवेक सुसाट बाईक पिटाळत आहे. तो ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघनही करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. दोघांनीही मास्क घातलेले नाहीत. विवेक ओबेरॉयने हेल्मेटही घातलेले नाही. स्वतः विवेक ओबेरॉयने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडवर विवेकच्या “साथियां’चे म्युजिकही ऐकू येते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मुंबई वाहतुक पोलिसांनी त्याची दखल घेतली. या व्हिडीओच्या आधारे विवेकवर कारवाई देखील केली गेली. बेजबाबदारपणे बाईक चालवणे, वाहतुकीच्या नियमांचा भंग करणे, हेल्मेट, मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी बाईक चालवणे आदी मुद्दयांच्या आधारे विवेकला 500 रुपयांचा दंड केला गेला.

ई चलन पद्धतीने विवेकने हा दंड भरला असल्याचे समजते आहे. सध्या विवेकबाबत बॉलिवूडमध्ये काही विशेष खबरबात नाही. पण नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी त्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक शिष्यवृत्तीची योजना जाहीर केली आहे. जेईई परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 16 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती त्याने देऊ केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.