पुणे – दहशतवादी हल्ले घडविताना वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांमधील विविध घटकांच्या तपासणीसाठी एक अद्ययावत यंत्रणा पुण्यात विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेला “रायडर-एक्स’ (रॅपिड आयडेंटिफिकेशन डिटेक्टर) हे नाव देण्यात आले असून, सुमारे 25 प्रकारच्या घटकांची ओळख या यंत्रणेद्वारे होऊ शकते.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) पुण्यातील प्रयोगशाळा असलेल्या “हाय एनर्जी मटेरिअल ऍन्ड रिसर्च लॅबोरेटरी’ (एचईएमाअरएल), बेंगळुरु येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था (आयआयएससी) या संस्थांच्या वतीने ही यंत्रणा विकसित केली आहे.
संस्थेतर्फे रविवारी (दि. 1) आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते या यंत्राचे अनावरण झाले. “रायडर-एक्स’ या यंत्रणेद्वारे रमन स्पेक्ट्रोस्कोपी या तंत्राचा वापर करून लपवलेल्या स्फोटकांची ओळख पटवून त्याचे वर्गीकरण केले जाते. साधारण दोन मीटरच्या अंतरावरूनही हा तपास करणे शक्य होते.
ज्या ठिकाणी स्फोटके असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी या यंत्रात असलेल्या लेझर लाईटचा प्रकाश टाकल्या जातो. तो प्रकाश परावर्तीत होऊन यंत्रात असलेल्या सॉप्टवेअरच्या साह्याने स्फोटकांचे वर्गीकरण करून लगेच माहिती मिळते.
एकाचवेळी तब्बल 25 विविध घटकांची ओळख, सोपे तंत्रज्ञान, आकाराने लहान साधने, सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे यंत्र अशा वैशिष्ट्यपूर्ण घटकामुळे हे यंत्र सुरक्षा यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
रायडर-एक्स या यंत्राची उपयोगिता पाहता मुंबई एटीस पथकाद्वारे या यंत्राची मागणी केली आहे. सध्या “एचईएमआरएल’नेच तयार केलेले ओपीएक्स रेव्हीटर नामक स्फोटक शोध यंत्र मुंबई एटीस आणि तेलंगणा पोलीस वापरत आहेत. त्यांनी सूचविलेले बदल या यंत्रात केले जाणार आहे. “रायडर-एक्स’ या यंत्राच्याही याच पद्धतीने चाचण्या करून त्याचे प्रत्यक्ष उत्पादन घेतले जाणार आहे.