लातूर – राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोंकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरडी कोसळून, घरे कोसळून मोठी हानी होत असल्याच्या घटना घडत आहेत.
अशातच गुरुवारी दुपारी लातूर शहरात रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारोती सिद्राम काळे (वय ४८, रा. चांडेश्वर ) असे मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शहरातील उषाकिरण टॉकीज समोरच्या परिसरात ही घटना घडली.
गुरूवारी दुपारी मारोती काळे उषाकिरण टाॅकीज समोर रिक्षात थाबले होते. यावेळी अचानक झाड कोसळले. यात काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवाशी जखमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे.