शुल्क आकारणीस काही संघटनांचा विरोध
पुणे -अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे लागणाऱ्या रुग्ण आणि नागरिकांच्या प्रवासासाठी खासगी कंपनीकडून अत्यावश्यक रिक्षा सेवा देण्यात येत होती. मात्र, या सेवेसाठी रिक्षा चालकांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काला काही संघटनांनी विरोध केला असून, यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने सिटी ग्लाइड या कंपनीकडून रिक्षा सेवा देण्यात येत होती. सध्या सुमारे पाचशे रिक्षांना परवानगी होती. मात्र, संस्थेने रिक्षाचालकांकडून सर्व्हिस चार्जची आकारणी केली होती. मात्र, याला शहरातील रिक्षा संघटनांनी विरोध केला होता. या आरोपातून ही सेवा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
काही नागरिकांनी चुकीचे आरोप केल्याने, ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, योजनेत समावेश असलेल्या रिक्षाचालकांकडून पासेस परत घेण्यात येत आहेत, अशी माहिती सिटी ग्लाइडच्या वतीने राहुल शितोळे यांनी दिली.
अत्यावश्यक रिक्षा सेवा स्थगित करण्याबाबत सिटीग्लाइड संस्थेने वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु सेवा सुरू ठेवावी, यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
– अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.