प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे रिक्षा भाडे फलक प्रदर्शित

नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकाचा महिन्याला सत्कार करा – डॉ. अभिनव देशमुख

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्यावतीने ग्राहकांच्या माहितीसाठी अंदाजे रिक्षा भाडे दर्शविणाऱ्या फलकाचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते  अनावरण झाले. सर्व नियमांचे पालन करणाऱ्या आणि ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणाऱ्या रिक्षा चालकाचा प्रत्येक महिन्याला सत्कार करा. तसेच शहरातील पर्यटन स्थळांची माहिती ठेऊन पोलीसांनीही पर्यटकांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज व्यक्त केली.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्यावतीने ग्राहकांच्या माहितीसाठी इच्छीत स्थळाचे अंतर आणि अंदाजे रिक्षा भाडे दर्शविणारे फलक, मध्यवर्ती बस स्थानकासमोर आणि छत्रपती शाहूजी महाराज रेल्वे स्थानक परिसरात आज प्रदर्शित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीवन अल्वारीस, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर, वाहतूक निरीक्षक पी. डी. सावंत, स्टेशन अधिक्षक ए. आय. फर्नांडिस, इंच्छा संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेटे उपस्थित होते.

यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, शहरात येणाऱ्या पर्यटकाला केवळ लोकप्रिय स्थळांचीच माहिती असते. अशा वेळी रिक्षाने जाताना ते पोलीसांना विचारणा करत असतात. त्यामुळे पोलीसांनीही शहर परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती आणि वेळा यांची माहिती ठेऊन पर्यटकांना मार्गदर्शन करावे. सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करणारा आणि ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक देणाऱ्या रिक्षा चालकाचा प्रत्येक महिन्याला सत्कार करावा, असेही ते म्हणाले.

डॉ. अल्वारीस यावेळी म्हणाले, शहरात नवीन येणाऱ्या प्रवाशांना अंतर, रिक्षाचे भाडे याविषयी माहिती नसते. त्यांच्यासाठी हे फलक पहिल्या टप्प्यात लावण्यात आले आहेत. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.