रिक्षा चालकांची मदत कागदावरच

परवाना धारकांसोबत चालकांनासुद्धा मदत देण्याची मागणी

पिंपरी – वाढत्या करोना संक्रमणामुळे राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला राज्य शासनाने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यात रिक्षा चालकांना शासनातर्फे मिळालेली आर्थिक मदत अद्याप कागदावरच आहे. परमिट धारकांनाच नव्हे तर, रिक्षा चालक – मालकांना सुद्धा सरसकट मदत मिळावी, अशी मागणी शहरातील रिक्षा संघटनांनी केली आहे.

राज्यातील परमिट धारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आर्थिक दुर्बल घटकांना 3 हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यात रिक्षाचालकांचाही समावेश होतो. मात्र, दोन्ही निर्णयाची नेमकी माहिती रिक्षाचालकापर्यंत पोहचली नाही. परमिट धारकांना त्याचा फायदा होणार असल्याने इतर बॅच धारक रिक्षा चालक त्यास मुकणार का? अशी संभ्रमावस्थेत रिक्षा चालक आहेत.

सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात 18 हजारा रिक्षांची संख्या आहे. तर, चालकांची सुमारे 20 हजार संख्या आहे. परमिट धारकांची संख्या आरटीओ कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र, आरटीओकडे अशी कोणत्याही प्रकाराची माहिती शासनाने व महापालिकेने मागितली नाही. त्यामुळे नेमकी ही मदत कोणाच्या माध्यमातून वाटप होईल, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, सर्व रिक्षाचालक आपल्याकडील बॅच, ओळखपत्र व बॅंकेचे पासबूक घेऊन चौकशी करीत आहेत. प्रत्यक्षात योजना सध्यातरी कागदावरच असल्याचे दिसतेय.

राज्य शासनाने रिक्षा चालक- मालकांना मदतीची घोषणा केली आहे. मात्र, कुठल्या खात्यामार्फत यंत्रणा राबवत मदत करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील चालक-मालकांना 3 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. यामध्ये चालक आणि मालक यांना त्वरीत मदत मिळावी.
– बाबा कांबळे, अध्यक्ष , महाराष्ट्र रिक्षा पंचायत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.