पिंपरी – रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या 38 वर्षीय रिक्षा चालकाचा ब्रेन डेड झाल्याचे निदान झाले. कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले आहे.
रस्ते अपघातात एका 38 वर्षीय रिक्षचालकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारांदरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयकांनी समुपदेशन करत रुग्णाच्या नातेवाइकांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय, स्वादुपिंड, यकृत, नेत्रपटल, दोन मूत्रपिंड हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्यात आले यामध्ये एक मूत्रपिंड आणि यकृत हे डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांचे प्रत्यारोपण पुण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आले.
अवयवदात्याच्या नातेवाइकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उप कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.
या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो अशी भावना व्यक्त करत डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी अवयवदात्याच्या नातेवाइकांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.