हॉर्न वाजवला म्हणून रिक्षाचालकाचे अपहरण

पिंपरी – हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन झालेल्या वादामध्ये कारचालकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याचे अपहरण केले. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.25) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खराळवाडी येथील सुदर्शननगर ते कासारवाडी दरम्यान घडली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत रिक्षाचालकाची सुटका करुन कारचालकास अटक केली आहे.

सोमेश्‍वर संगम गिरी (वय 21, रा. कासारवाडी) असे अपहरण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हितेश प्रल्हाद खेदार (वय 21, रा. रेल्वेगेटखाली शंकर मंदिराजवळ, लांडगेवस्ती, कासारवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, कारचालक राजेश विष्णु धोत्रे (वय 24, रा. भागवत गीता मंदिराजवळ, खराळवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रिक्षाचालक सोमेश्‍वर आणि हितेश हे दोघे त्यांच्या एका मित्राला सोडवण्यासाठी त्यांच्या रिक्षाने खराळवाडी येथे आले होते. यावेळी रस्त्याने जात असताना सोमेश्‍वरने समोरील स्विफ्ट कार (क्र.एमएच 14/2889) ला हॉर्न वाजवला. यावेळी कारचा चालक राजेश धोत्रे याने हॉर्न का वाजवला असे म्हणून वाद घातला. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सोमेश्‍वर याचे अपहरण केले. पिंपरी पोलिसांनी सकाळी सात वाजता कासारवाडी येथून आरोपी राजेश याला अटक करुन सोमेश्‍वर याची सुटका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.