दिल्ली हायकोर्टाच्या सरकार, पोलिस व निवडणूक आयोगाला नोटीसा
नवी दिल्ली – दिल्लीतील एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षावर आय लव्ह केजरीवाल असा संदेश लिहील्याने त्या रिक्षा चालकाला दिल्ली पोलिसांनी दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच्या विरोधात या रिक्षा चालकाने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला असून हायकोर्टाने या प्रकरणी आम आदमी पक्षाचे सरकार, दिल्ली पोलिस व निवडणूक आयोगाला नोटीसा जारी केल्या आहेत.
राजकीय द्वेषापोटी आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपशील जमा करण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी विनवणी दिल्ली सरकार व दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयात केली. तथापी निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितले की, संबंधीत रिक्षा चालकावर निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याच्या कारणावरून दहा हजार रूपयांचा दंड केला असावा. त्याला रिक्षा चालकांच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले आहे की ही राजकीय जाहीरात नाही. आणि जरी ती राजकीय जाहीरात आहे असे मानले तरी रिक्षा चालकाने आपल्या मर्जीने व आपल्या खर्चाने आपल्या रिक्षावर केजरीवालांविषयी प्रेम व्यक्त केले आहे त्याचा निवडणुकीशी किंवा राजकारणाशी संबंध नाही.
आपल्या रिक्षावर काय लिहायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या रिक्षा चालकाला आहे. एखाद्या व्यक्तीने स्वर्चाने केलेल्या जाहीरातीचा निवडणूक आचार संहितेशी संबंध येत नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. चालत्या वाहनांवर जाहींराती लावण्यास दिल्ली सरकारने सन 2018 साली अनुमती दिली आहे असा दाखलाही रिक्षा चालकाच्या वकिलाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्च रोजी ठेवण्यात आली असून तो पर्यंत संबंधीतांनी आपले म्हणणे कोर्टात सादर करावे असा आदेश कोर्टाने दिला आहे.