काबूल – अफगाणिस्तानच्या पूर्व भागात शुक्रवारी रिक्षाबॉम्बच्या स्फोटात 15 बालकांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अफगाणच्या गिलान जिल्ह्यातील एका गावात काही वस्तूंच्या आणि खेळण्यांच्या विक्रीसाठी एक विक्रेता रिक्षा घेऊन गेला. त्या रिक्षाभोवती लहान मुलांनी गर्दी केली. त्यानंतर काही क्षणांत रिक्षाचा स्फोट झाला. रिक्षात बॉम्ब बसवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्या स्फोटाची जबाबदारी तातडीने कुठल्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही.
लहान मुलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशातूनच स्फोट घडवण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न अफगाण तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. त्या देशात प्रामुख्याने तालिबान ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. त्या संघटनेशी शांतता करार करण्यासाठी अफगाण सरकार प्रयत्नशील आहे.
तसे असूनही मागील काही महिन्यांत अफगाणमध्ये हिंसाचार वाढल्याचे चित्र आहे. आता थेट बालकांना लक्ष्य करण्यात आल्याने त्या देशातील स्थिती चिंताजनक पातळीवर पोहचल्याचे मानले जात आहे.