कोरोना संसर्गाचा मुकाबला केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग करत आहे. भारतातही युद्धपातळीवर करोनाशी दोन हात केले जात आहेत. यात सेलिब्रिटी मंडळी देखील उतरली आहे. शाहरुख खान, अक्षयकुमारपाठोपाठ आता अभिनेत्री रिचा चढ्ढा देखील गरजूंच्या मदतीसाठी पुढे आली आहे. ती एका गुरुद्वाराच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत जेवणाची व्यवस्था करत आहे.
तिने आपल्या चाहत्यांना देखील मदत करण्याचे आवाहन केले आहे. रिचा चढ्ढाने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले की, जेव्हा मी गुरुद्वाराशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी केवळ धान्य घेणार असल्याचे सांगितले. पैसे घेण्यास नकार दिला.
तेव्हा मी जवळच्या किराणा दुकानात गेले. पण तेथे गेल्यावर गुरुद्वारात दररोज अडीचशे किलो रेशन लागत असल्याचे कळून चुकले. त्यामुळे मोठ्या होलसेल दुकानाचा शोध सुरू केला. यासाठी तिने सोशल मीडियावरून मदतही मागितली आहे. तिने म्हटले की, सध्याच्या काळात एका व्यक्तीला किंवा एका कुटुंबाला मदत करणे देखील पुरेसे आहे. काही जण म्हणतील की एका व्यक्तीला मदत केल्याने काय फरक पडणार आहे. परंतु तो केवळ एकच व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला मदतीमुळे निश्चितच फरक पडतो. कारण तो आता उपाशी राहणार नाही. सध्याच्या काळात मदतीसाठी सर्वांनी नेहमीच पुढाकार घ्यायला हवा.