130 कोटी लसींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

श्रीमंत देश अगोदर लस “बळकावण्याची’ शक्‍यता

मुंबई – करोनावरील लस उत्पादनाच्या विविध टप्प्यावर असताना श्रीमंत देशांनी विविध कंपन्याकडे पहिल्या 130 कोटी लसीच्या डोसचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून टाकले आहे. त्यामुळे लसीसाठीच्या रांगेत गरीब देशांना मागे ताटकळत उभे राहावे लागण्याची शक्‍यता आहे.

अमेरिका, युरोपातील देश, जपान विविध कंपन्यांकडे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करीत आहेत. 130 कोटी लसीचे बुकिंग अगोदरच करून टाकले आहे. त्याचबरोबर हे देश आणखी 150 कोटी लसीचे बुकिंग करण्यासाठी विविध कंपन्याबरोबर चर्चा करीत आहेत.

श्रीमंत देशातील लोकसंख्या 150 कोटी पेक्षा थोडी कमी आहे सध्या जगाची लोकसंख्या 780 कोटी इतकी आहे. सध्या विविध कंपन्या या लसीच्या चाचण्या घेत आहेत. ही लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यानंतर उत्पादन सुरू होईल. त्यामुळे 2021 च्या पहिल्या तिमाहीत ही लस उपलब्ध होऊ शकेल. मात्र ही लस तयार करण्यासाठी श्रीमंत देशांनी कंपन्यांना अगोदरच पैसे दिले असल्यामुळे या कंपन्या श्रीमंत देशाची मागणी पूर्ण करून नंतर इतर देशांना लस पुरविण्याची शक्‍यता आहे.

अशा अवस्थेत गरीब देशावर रांगेत उभे राहण्याची वेळ येणार आहे. प्राप्त माहितीनुसार लसीचा एक डोस पुरेसा होणार नाही. त्यासाठी दोन डोस द्यावे लागणार आहेत. अशा अवस्थेत उत्पादनक्षमता वाढवावी लागणार आहे. तरच कमी वेळात ही लस संपूर्ण जगातील जनतेला उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान सध्या जगातील औषध उत्पादन क्षेत्र बरेच विकसित झाले आहे. जर सर्व कंपन्यांनी समन्वयाने प्रयत्न केला तर कमी कालावधीत जगांना पुरेल एवढी लस उपलब्ध होऊ शकणार आहेत. मात्र याच्या वितरणावर देखरेख ठेवण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा लस उपलब्ध असूनही ती लवकर मिळावी म्हणून गोंधळ वाढू शकतो. यासाठी सर्व देशांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची

लस मिळविण्यासाठी भाऊगर्दी झाल्यानंतर या लसीचे न्याय वितरण व्हावे यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आरोग्य संघटनेने 2021 पर्यंत 200 कोटी डोस मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र श्रीमंत देश जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांना मानतील की नाही हे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.