पुणे – तांदळाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात सर्व प्रकारचा नवीन तांदुळ दाखल होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस दरवर्षी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून आंबेमोहर तांदळाची आवक सुरू होते. त्याप्रमाणे यावर्षीही सुरू झाली आहे.
परदेशातून मागणी वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत भावात क्विंटलमागे 800 ते 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात नवीन तांदळाच्या प्रतिक्विंटलला 6,800 ते 8,000 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात नवीन आंबेमोहोरची 70 ते 82 रुपये किलो भावाने विक्री सुरू आहे.
तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, निर्यातदार देशांत अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याने तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी अमेरिका, युरोप आणि आफ्रिका यादेशांमधून भारतीय आंबेमोहोरासह अन्य बिगर बासमती तांदळाला मागणी होत आहे.
त्यातुलनेत स्थानिक बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने आंबेमोहोरच्या भावात वाढ झाली आहे. तर, लचकारी कोलमच्या भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथील शेतकरी पारंपरिक बासमती तांदळाऐवजी 1121 बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळला आहे. त्यातील 80 टक्के बासमती तांदूळ स्टिम करून निर्यातीसाठी हॉटेल व केटरिंग आणि इंस्टिट्युशनल उपयोगासाठी वापरला जातो.