चिंचवडसाठी भाजपमध्ये रस्सीखेच

जगतापांचे स्पर्धक वाढले ः नगरसेवक संदीप वाघेरे यांचीही उडी

“मोदी’ लढू शकतात तर “मी’ का नाही?

आपले वास्तव्य पिंपरी विधानसभा मतदारसंघात असून आपण चिंचवडमधून लढणार का? असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी थेट “मोदीं’चेच उदाहरण दिले. गुजरातऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसीतून लढू शकतात तर मी चिंचवडमधून का लढू शकत नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. देशात आणि पक्षात लोकशाही असून आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचेही वाघेरे यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना पक्षांतर्गत विरोध नसल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. ऍड. सचिन पटवर्धन यांनी छुपी तयारी चालविली असतानाच या मतदारसंघातून आपणही इच्छुक असल्याचे सांगत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राजकीय आज (शुक्रवारी) राजकीय खळबळ उडवून दिली.

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा लक्ष्मण जगताप यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्ला समजला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्‍य मिळाले होते.

या मतदारसंघात भाजपाला चांगली संधी आहे. लक्ष्मण जगताप यांचे मतदार संघावर वर्चस्व असले तरी सध्या “कमळ’ चिन्हाचा बोलबाला असल्यामुळे इतरांनाही विजयाची खात्री वाटू लागली आहे. भाजपाचे अत्यंत जुने कार्यकर्ते आणि सध्याचे राज्यलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन हे या मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा रंगली होती.

जगताप आणि पटवर्धन हे दोघे इच्छुक असले तरी जगताप यांनाच उमेदवारी मिळेल असे बोलले जात असतानाच आता पिंपरीतील नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही चिंचवडमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढणार असल्याची घोषणाच आज त्यांनी केली. त्यामुळे भाजपातील अंतर्गत स्पर्धा तीव्र होत असल्याचेच समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.