संधिवात की सांधेदुखी : निदान, काळजी व उपचार 

डॉ.सचिन नागापूरकर

प्रतिवर्षी 12 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक संधिवात-सांधेदुखी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीला येणारी काठी, गुडघेदुखी, मान-पाठ-कंबरदुखी आज वयाच्या चाळीसीतच बघायला मिळत आहे.

वयोमानाप्रमाणे येणारी ही हाडांची दुखणी आता असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे लवकर सुरू झाली आहेत. दवाखान्यात येणाऱ्या अनेक पेशंटला शंका असते की, डॉक्‍टर माझे हे दुखणे संधिवातामुळे आहे की हा सांधेदुखीचा एक प्रकार आहे. चला तर मग थोडे या बाबत मार्गदर्शन घेऊ यात.

वयोमानानुसार होणारी सांध्याची झीज, हाडांची झीज, स्नायू कमकुवत होणे व त्यायोगे हाडांवर येणारा ताण व सांध्याची झीज हा सांधेदुखीचा आजार आहे. पुर्वी ही सांधेदुखी वयाच्या साठीला बघायला मिळत होती, पण आज तरूण वयात हाडे ठिसूळ, अपघातात हाडांना दुखापत होणे, सांध्याच्या स्नायूंना इजा होणे, मधूमेह, थॉयरॉईड ग्रंथींच्या आजारामुळे, धुम्रपान, दारू याच्या अतिसेवनामुळे आज तरूण वयात हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते आहे.

परिणामी हाडे, सांधे यांची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे व सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्‍यता वाढत चालली आहे. महिलांमध्ये हे सांधेदुखीचे प्रमाण खुप आहे. गरोदरपणामुळे, वजन वाढल्यामुळे, मासिक पाळीचे आजार, मासिक पाळी बंद झाल्यानंतर किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे गर्भाशयाची पिशवी काढल्यामुळे, महिलांना हाडे ,सांधे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच सांधेदुखाचा आजार लवकर होण्याची शक्‍यता असते.

सांधेदुखीमध्ये साधारणपणे एक अथवा दोन सांधे दुखतात.संधिवात म्हणजे काय. तर हा एक प्रकारचा आजार आहे जो लहान पाच वर्षे वयाच्या वयापासून ते 60-70 वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये पेशंटला सांधेदुखीचा त्रास तर होतोच पण सांध्यांवर सुज येणे, सांधा गरम होणे, सांधा लालसर होणे, सतत सांधा दुखत राहणे अशी लक्षणे दिसू लागतात. शरिरातील दोन किंवा जास्त सांधे एकाच वेळी दुखत असतात. सांध्याच्या हालचालींमध्ये मर्यादा येतात.

सांधे दुखण्याचे प्रमाण सकाळी, म्हणजे वातावरणात जेव्हा गारवा असतो, त्यावेळी जास्त प्रमाणात असते. वारंवार वेदनाशामक औषधे घेणे गरजेचे पडते. सांध्यांची झीज सांधेदुखीपेक्षा संधिवाताच्या आजारात जास्त प्रमाणात होते. सांध्यांची रचना बदलायला सुरुवात होते. गुडघ्याला बाक येणे, कंबरेची हालचाल मंदावते. भारतीय बैठकीचा संडास वापरताना व मांडी घालून बसताना त्रास होणे.

निदान
सांधेदुखी व संधिवात यामध्ये निदान करताना प्रामुख्याने रुग्णांची लक्षणे बघितली जातात. रुग्णाच्या वयाचा, बाकी शारिरीक आजारांचा अभ्यास केला जातो. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या करून व गरजेनुसार एक्‍स रे काढून त्याचे निदान करता येते.

उपचार
सांधेदुखीचा आजार असेल तर त्या प्रमाणे योग्य ती औषधे घेणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, समतोल आहार, योग्य तो व्यायाम. जीवनशैलीमधे बदल करावा लागतो, जसे की गुडघेदुखी व कंबरदुखीचा आजार असेल तर मांडी घालून खाली जमिनीवर बसणे टाळले पाहिजे. जीना चढ-उतार कमीत कमी करणे. भारतीय बैठक संडासचा वापर टाळणे. रोज सपाट रस्त्यावर चालणे. हलके व्यायाम करणे गरजेचे आहे.

संधिवाताचा आजार विचारात घेताना मात्र सखोल माहीती घेणे गरजेचे आहे. या संधिवाताच्या आजारामध्ये योग्य तो आहार, व्यायाम तर आवश्‍यक आहेच पण त्यासह शरिरामधून हा आजार कमी होण्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे. औषधांसोबत डॉक्‍टरांसोबत नियमित सल्लामसलत करणे गरजेचे आहे. सांधारोपण शस्त्रक्रिया करण्याची वेळ काही वेळा संधिवात व काही प्रमाणात सांधेदुखीच्या रुग्णांवर येऊ शकते.

काळजी
संधिवात हा आजार अनेक पेशंटमध्ये अनुवंशिकतेने येतो. त्यामुळे तो टाळणे जरी अवघड असले तरी ज्या पेशंटच्या घरामध्ये कोणाला संधिवाताचा त्रास असेल, तर त्या घरातील लोकांनी सुरुवातीपासूनच योग्य तो आहार, व्यायाम घ्यावा. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रक्‍त तपासण्या करून हा संधिवाताचा आजार होणार नाही, अथवा त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही याचीसाठी नक्‍कीच फायदा होईल.

सांधेदुखी तर आपण अनेक प्रमाणात टाळू शकतो ती अशी की व्यायाम, सकस आहार,वजनावर नियंत्रण, सांधे बळकट करण्यासाठी सांध्यांची हालचाल करणे. अतिआरामदायक जीवन शैलीचा वापर टाळणे. अति कष्टांची कामे टाळणे. सांधे दुखण्यास सुरुवात झाली की लगेच निदान करून घेऊन योग्य तो सल्ला घेऊन उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.