नवी दिल्ली -बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली त्याची अभिनेत्री मैत्रीण रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. तिला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
त्यासाठी रियाला आज शुक्रवारी 7 ऑगस्टला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.
सतीश मानशिंदे यांनी सांगितलं आहे की,’सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केली आहे.
दरम्यान,रिया आणि तिच्या कुटूंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा आधार घेऊन ईडीने याआधीच मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. रियावर सुशांतचे पैसे हडपल्याचाही आरोप आहे.