डेहराडून – लग्नाच्या मेजवानीत मद्याचा वापर करण्याच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या वधूला 10,001 रुपये बक्षीस देण्याचा निर्णय उत्तराखंडमधील टेहरी गढवाल जिल्ह्यातील देवप्रयाग येथील पोलिसांनी घेतला आहे.
गावातील सरपंचांच्या सहाकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार असून लग्नातील भोजनावळीत मद्य देण्यास विरोध करणाऱी वधू शोधण्याचे काम सरपंच करणार आहेत. या मोहिमेसाठी पोलिस निधी उभारणार असून त्यानंतर अशा वधूला बक्षीस देण्याचे काम प्रत्यक्षात होईल.
देवप्रयाग पोलिस ठाण्याचे प्रमुख महिपालसिंग रावत म्हणाले की, लग्नसमारंभात किंवा नंतर महिलांशी गैरवर्तन, घरगुती हिंसाचार, शत्रुत्वातून हिंसाचार अशा घटना वाढू लागल्यान पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील 101 गावांच्या सरपंचांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी चर्चेतून असे पुढे आली की, दारू पिणाऱ्यांमुळे गावांत गुन्हेगारी वाढत आहे. त्याचबरोबर लग्नसमारंभातील मेजवानीत पाहुण्यांना दारू देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चर्चेत सांगण्यात आले.
युवकांनी मद्यपानापासून लांब रहावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. अखेरीस मद्यपानाच्या विरोधात महिलांनीच आवाज उठवला तर अधिक प्रभावी ठरेल असा विचार पुढे आला. त्यातून लग्नातील जेवणात मद्य देण्यास विरोध करणाऱ्या वधूला बक्षीस देण्याचा मुद्दा पुढे आला. बहुतेक सरपंचांनी या योजनेला पाठिंबा व्यक्त केला आहे.