‘त्या’ रेशनिंग दुकानदारांचे परवाने रद्द करा

भाजप आक्रमक : मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन

वडगाव मावळ – करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नफेखोरी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करून ती परवाने महिला बचत गट व दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. 27) मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना देण्यात आले.

करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या नियमानुसार धान्य वितरण करत नसून, त्या रेशनकार्ड धारकांना शिवीगाळ व मारहाणी केल्याच्या घटना घडली. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांच्या नफेखोरीबाबत शेकडो तक्रारी आल्या आहेत.
करोनाच्या धर्तीवर गरीब गरजू कुटुंबांना जगण्यासाठी एकमेव शासनाच्या धान्यावर अवलंबून आहेत. मावळ तालुक्‍यात अज्ञानी आदिवासी असून, त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेतला.

तालुक्‍यातील सामान्य जनतेसाठी रेशनिंगचा धान्यपुरवठा हा गरजेचा विषय झाला आहे. या संकटाच्या काळात सामान्य जनतेची रेशन दुकानदारांकडून नफेखोरीसाठी होणाऱ्या फसवणुकीच्या आणि पिळवणुकीच्या तक्रारी आमच्या कानी आल्या. दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांचे परवाने रद्द करून महिला बचत गट, दिव्यांग व्यक्‍ती यांना द्यावे याबद्दलचे निवेदन तालुका तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना सुपूर्द करण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, तालुका संघटनमंत्री किरण राक्षे, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, पवन मावळ विभाग अध्यक्ष धनंजय टिळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नफेखोरी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर करडी नजर आहे. तालुक्‍यातील 12 दुकानदारांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी कुसवली व डोंगरगाव (लोणावळा) येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. यासंदर्भात 84 रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी सुरू आहे.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.