बेल्हे : विधानसभा निवडणुकीमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे रब्बीचे आवर्तन लांबल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. नवीन मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन कुकडीच्या रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. शेतकर्यांची मागणी व रब्बी पिकांची गरज विचारात घेऊन कुकडी पाटबंधारे विभागाने शनिवार (दि. 7) पासून डिंभे धरणातून डिंभे डावा व मीना शाखा कालव्यात, तर पिंपळगाव जोगे धरणातून शुक्रवारी (दि. 6) पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू केले आहे.
पिंपळगाव जोगे कालव्यामधून पाणी सोडण्याची मागणी राजुरी शेतक-यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी केली होती. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याची कमतरता जाणवत असून काही ठिकाणी पिके सूकायला लागली होती. तर अनेक ठिकाणी कांदा लागवडी रखडल्या होत्या. तर आता पिंपळ जोगे धरणाच्या कालव्यामधून पाणी सोडल्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
35 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना होणार फायदा
कुकडी पाटबंधारे विभागाने डिंभे धरणातून डिंभे डावा व मीना शाखा कालव्यात, तर पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू केले आहे. या पाण्याचा लाभ पुणे-अहिल्यानगर जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील 35 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना होणार आहे.
कुकडी डावा कालव्यात मंगळवारपासून आवर्तन
डिंभे धरणातून डिंभे डावा कालव्यात 500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी डिंभे डावा कालव्याला जोडलेल्या मीना शाखा व घोड शाखा कालव्यात वळवण्यात येणार आहे. पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात शुक्रवारी (दि. 6) पासून 100 क्युसेकने पाणी सोडले आहे. या पाण्याचा लाभ जुन्नरचा उत्तर भाग व पारनेर तालुक्याला होणार आहे. कुकडी डावा कालव्यात 10 डिसेंबरपासून आवर्तन सुरू करण्याचे नियोजन आहे.