पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षा निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करत सुधारित निकाल तयार केला आहे. त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांचा ऑनलाइनद्वारे जाहीर केली आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या या ऑनलाइन परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना समोरे जावे लागले. त्याचा परिणाम निकालवर झाला. अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, सुधारित निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत दोन हजार जणांचा जाहीर झाला आहे. उर्वरित लवकरच अपलोड केला जाईल.
दरम्यान, विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण अजून अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध झालेली नाही.
परदेशी शिक्षण, पदव्युत्तर पदवीचा प्रवेश, बार काउन्सिलकडे विधीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी नोंदणी व त्याची संपत आलेली मुदत यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे. विद्यापीठाकडे आतापर्यंत फार्मसी, इंजिनिअरींगच्या गुणपत्रिका छापून पूर्ण केल्या आहेत, त्या संबंधित महाविद्यालयाकडे पाठवल्या आहेत. उर्वरित अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका येत्या काही दिवसांत उपलब्ध होतील, असे काकडे यांनी सांगितले.