पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षा निकालात काही विद्यार्थ्यांना शून्य गुण, कमी गुण दिल्याचे निदर्शनास आले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल 15 डिसेंबरपर्यंत जाहीर होणार असल्याचे परीक्षा विभागाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे निकालात त्रुटी राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्ष परीक्षा घेतली. विशेषत: ऑनलाइन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होताच तांत्रिक कारणाने अनेकांना गैरहजर दाखवल्याचे समोर आले. तसेच शून्य व कमी गुण असेही मिळाल्याने विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न पडला होता.
कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे आपल्या तक्रारी व अडचणीही मांडली होती. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थी चिंतातुर झाले होते.