नवी दिल्ली – तब्बल दोन महिने बंद राहिल्यानंतर देशांतर्गत विमान वाहतुकीला सोमवारपासून कडक निकषांच्या आधारे पुन्हा सुरुवात होत आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विमान कंपन्यांना प्रवासासाठीची विमान वाहतूक मंत्रालयाने निश्चित केलेले सर्वात जास्त आणि सर्वात कमी तिकीट दरांचे निकष पाळावे लागणार आहेत. हे सुधारित निकष जाहीर करताना ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी कोविड-19 ची साथ आटोक्यात येईपर्यंत विमान प्रवास करू नये, अशी सूचनाही विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
सर्व प्रवाशांनी वैद्यकीय तपासणी केलेली असायला हवी. ही माहिती आरोग्य सेतू ऍपद्वारे उपलब्ध करून द्यायला हवी किंवा आरोग्याबाबत स्वयं घोषणा अर्ज भरून द्यावा लागेल. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांनाही विमान प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. विमानतळावर फिजिकल चेक इन काउंटर नसणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेब-चेक इन करावे लागणार आहे.
विमानामध्ये भोजन उपलब्ध होणार नाही. शारीरिक तापमान तपासणे बंधनकारक असेल. प्रत्येक प्रवाशाच्या हातात एकच बॅग असणार आहे. ज्या प्रवाशांची कोविड-19 ची चाचणी “पॉझिटिव्ह’ आली असेल, त्यांना विमान प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. सर्व प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. विमान उड्डाणापूर्वी दोन तास प्रवाशांना उपस्थित राहावे लागेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागेल.
विमान प्राधिकरणाकडून आदर्श मार्गदर्शक सूचना
विमानतळावरील कार्याच्या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाने एक आदर्श मार्गदर्शिका लागू केली आहे. त्यात नमूद केल्यानुसार 14 वर्षांखालील मुलांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलेले असणे अनिवार्य असणार नाही. थर्मल स्क्रीनिंगसाठी प्रवाशांना स्क्रीनिंग झोनमधूनच जावे लागेल. प्रवाशांच्या सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची योग्य सुविधा विमानतळांवर उपलब्ध करून द्यावी लागेल.