निवडणूक आयोगाकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

वरिष्ठ निवडणूक उपायुक्‍त उमेश सिन्हा यांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी यशदा येथे निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्‍त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करून द्यावे. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेऊन, आवश्‍यक सोयी-सुविधा असाव्यात. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदारयादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. तसेच मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मतदानाबाबत व्यापक जनजागृती करा
निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेऊन, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुणे विभागात येणाऱ्या सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी अधिकारी वर्गाला केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)