नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा शपथविधी होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प जागतिक व्यापाराबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. या वक्तव्याशी भारताचाही संबंध येत आहे. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापाराचा आढावा वाणिज्य मंत्रालयाकडून घेतला जात आहे.
ट्रम्प यांनी या अगोदरच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि प्रचार मोहिमेत भारत आयात शुल्काचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला होता. भारत – अमेरिका व्यापारात आत्तापर्यंत कसलाही अडथळा आलेला नसला तरी ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शक्य परिणामाबाबत वाणिज्य मंत्रालयात चर्चा चालू आहे.
विविध देश व्यापारात आपल्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून आयात- निर्यात शुल्क लावत असतात. भारताने संबंधित देशावर जास्त परिणाम होईल असे कुठलेही कृत्य केलेले नाही. प्रत्यक्षात अमेरिकेने अनेक वस्तूवर 100% पेक्षा जास्त आयात शुल्क अगोदरच लावले आहे. अमेरिकेत दुधाच्या उत्पादनावर 188 टक्के, फळे आणि भाज्यावर 132 टक्के, कॉफी, चहा, कोका, मसाल्यावर 53 टक्के, डाळी आणि तयार अन्न घटकावर 193 टक्के, तेलबिया, खाद्य तेलावर 164 टक्के, पेय आणि तंबाखू वर 150 टक्के. माशांवर 35 टक्के, खनिज आणि ज धातूवर 187 टक्के तर रसायनावर 56 टक्के आयात शुल्क लावलेले आहे. तरीही ट्रम्प इतर देशावर जास्त आयात शुल्काचा आरोप करीत आहेत.
भारत अमेरिका व्यापार भारतासाठी महत्त्वाचा आहे. सरलेल्या वर्षात भारताने अमेरिकेला 77 अब्ज डॉलरची निर्यात केली. तर 42 अब्ज डॉलरची आयात केली. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांना भारताचा मित्र संबोधले होते. मात्र त्यानंतर एक आठवड्यातच ट्रम्प यांनी भारताबाबत नकारात्मक वक्तव्य केले आहे. जागतिक व्यापारात चलन म्हणून भारत डॉलरच वापरणार असल्याचे स्पष्टीकरण काल अर्थ मंत्रालयाने केले आहे.
पोकळ धमकी तंत्राचा अवलंब
अमेरिकेचे अध्यक्ष होण्यास ट्रम्प यांना दीड महिन्याचा कालावधी आहे. मात्र आताच ट्रम्प विविध देशांना धमक्या देत आहेत. या केवळ पोकळ धमक्या आहेत, जेणेकरून या विषयावरील चर्चेवेळी अमेरिकेचा फायदा व्हावा असा ट्रम्प यांचा दृष्टिकोन असू शकतो. मात्र यामुळे चलन आणि विविध बाजारात अस्थिरता निर्माण होत आहे. भारतासह अनेक देशांनी मुक्त व्यापार सर्वांसाठी योग्य असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे.