जळोची -करोनामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधांची उपलब्धता आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती मतदारसंघाबरोबरच एकूणच पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रांची सध्याची स्थिती काय आहे, तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या, उपचार आणि सुविधा, खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनची सध्यस्थिती, रेमडेसिविर आदी बाबींवर यावेळी सर्वांगीण चर्चा झाली.
सध्या कोव्हीशिल्ड लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली लसीकरण केंद्रे, गर्दी पाहून योग्य नियोजन करणे, लाभार्थ्यांची आगाऊ नोंदणी, गर्दीवर नियंत्रण ज्येष्ठ नागरिकांची काळजी आदी सूचनाही यावेळी सुळे यांनी दिल्या.